। नवी मुंबई । वार्ताहर ।
तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी नेरुळ येथील मीनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेची दैनंदिन चाचणी क्षमता वाढविण्यात येणार आहे. सध्या या प्रयोगशाळेत दिवसाला दोन हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. पण ही क्षमता येत्या काळात थेट पाच हजार चाचण्या अशी होणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्य शासनाने निश्चित केलेल्या प्रयोगशाळेतून कोरोना चाचणी केली जात होती. नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेची प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला. नेरुळ येथील सार्वजनिक रुग्णालयाची इमारत नव्याने बांधण्यात आली असून हे रुग्णालय सुरू करण्याच्या प्रतीक्षेत होते. त्या रुग्णालयाच्या दुसर्या मजल्यावर ही प्रयोगशाळा कमी कालावधीत उभारण्यात आली. दिवसाला एक हजार करोना चाचणी करणारी ही प्रयोगशाळा केवळ 11 महिन्यांत सुरू करण्यात आली. त्यानंतर गेले वर्षभर या प्रयोगशाळेत शहरातील सर्व करोना रुग्णांची चाचणी केली जात असून आता ही क्षमता दोन हजार चाचण्यांची आहे त्यामुळे आतापर्यंत पाच लाख 75 हजार 13 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत.