। उरण । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नविन पनवेल मधील काही सिडको उद्यानातून दिवसाढवळ्या पाणी चोरी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. जे समाजसेवक सिडकोवर हंडा मोर्चा घेऊन गेले होते, यांच्या डोळ्या देखत पाणीचोरी होत आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. या पाणी चोरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नवीन पनवेल रेल्वे स्टेशन जवळील सेक्टर 17 मधील सिडको उद्यानातून पिण्याचे पाणी चोरी केले जात आहे. पाणीपुरी, ज्युस, वडापाव, डोसा, इटली सांबर, चायनीज विक्रेते असे अनेक फेरीवाले हे त्यांना लागणारे पिण्याचे पाणी येथिल उद्यानातून सकाळ, संध्याकाळ चोरून वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र याकडे सिडको आणि महापालिका प्रशासन धृतराष्ट्रची भूमिकेतून पाहत आहे. या पाणी चोरांना अटकाव करून त्यांच्याकडून होत असणारा पाण्याचा अपव्यय थांबवावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. एकीकडे सिडको पाणीपुरवठा विभागाच्या भिंतीवर पाण्याचे महत्त्व तसेच पाणी बचती बाबत नियम लावले जातात. नागरिकांनी नियम पाळले नाहीतर कारवाई केली जाईल असे बनर लावून जाहीरातीपण करतात. मात्र दुसरीकडे पिण्याचे पाण्याची चोरी केली जात असताना सिडको अधिकार्यांनाकडून कानाडोळा केला जातो.