| रसायनी | वार्ताहर |
महाराष्ट्रात प्रजनन, मत्स्यपालन आणि वाहतूक व विक्रीवर बंदी असताही खालापूर तालुक्यात मागूर माशांचे संवर्धन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आरोग्य आणि पर्यावरणाला अपायकारक असणाऱ्या या माशांचे पालन आणि विक्रीविरोधात पाताळगंगा नदी संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरूण जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दोन टप्यात कारवाई करण्यात आली होती. तरीही मांगूर संवर्धन सुरू असल्यामुळे मत्स विभागाचे अजया भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा चांभार्ली गावालगत मत्स्यसंवर्धन तलावांवर धाड टाकण्यात आली. यावेळी पाच टन मांगूर मासे जप्त करीत जमिनीत जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खणून त्यामध्ये मीठ टाकून शास्त्रीय दृष्ट्या नष्ट करण्यात आले.
मांगूर मासे सेवन केल्यामुळे कॅन्सर सारख्या महारोग होण्याची दाट शक्यता आहे. मानवी आरोग्याला घातक असलेला इतर माशांच्या प्रजाती नष्ट करणारा आणि पर्यावरण संवेदनशिलतेला हानीकारक असणाऱ्या अवैधपणे मत्सपालन खालापूरात सुरु असल्याची तक्रार पाताळगंगा नदी संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी केल्यावर त्यानंतर सहाय्यक मत्स्य आयुक्त संजय पाटील यांनी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांचा लवाजमा सोबत घेऊन पहिल्या टप्यात महड, धामणी येथे यापूर्वी कारवाई केली. दुसऱ्या टप्प्यात माजगांव परिसरात कारवाई करीत खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
यावेळी मत्स विभागाचे अजया भाटकर, सोनल तोडणकर, प्रदुषण मंडळाचे उत्तम माने, पाटबंधारे उपविभागाचे वाघ, पाताळगंगा नदी संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जाधव आणि मोहपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.