अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी आरोपीला पाच वर्षांचा कारावास

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी अमलेश कुमार उमेश साह यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. सावंत यांनी पाच वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे पिडित मुलीला न्याय मिळाला असून तिच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रकरणात न्यायालयाने आरोपीस दोषी पकडून 3 वर्षांची शिक्षा व 5 हजार रुपये दंड व पोक्सो कायद्यानूसार 5 वर्षांची शिक्षा व 6 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. गतवर्षी 3 फेब्रुवारीला दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास धोकडवडे येथे पिडित राहत असलेल्या घरात ही घटना घडली. पिडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत मुलीने घडलेला सारा प्रकार घरातील मंडळींना सांगितला. त्यामुळे संतापलेल्या कुटूंबियांनी आरोपीविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम तसेच त्यांच्या सहकार्‍यांनी जलदगतीने पूर्ण करुन मोलाचे सहकार्य केले. या खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता स्मिता राजाराम धुमाळ-पाटील यांनी एकूण 3 महत्वाचे साक्षीदार तपासले. स्मिता धुमाळ यांनी केलेला युक्तीवाद महत्वपूर्ण ठरला. यातील फिर्यादी साक्षीदार, पिडीता मुलगी तसेच तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच पोलिस हवालदार सचिन खैरनार, पैरवी कर्मचारी महिला पोलिस शिपाई प्रियंका नागावकर, पोलिस हवालदार संदेश ठाकूर, पोलिस नाईक अमर जोशी, मांडवा पोलीस ठाणे यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

Exit mobile version