। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी अभिषेक राजेश पारंगे यास विशेष व अति सत्र न्यायाधीश-1 सईदा शेख यांनी बुधवारी (दि.30) सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. हा गुन्हा हा दि. 02 जुलै 2017 रोजी सायंकाळी 06.30 वाजण्याच्या सुमारास हिराकोट तलाव, अलिबाग येथे घडला.
या प्रकरणातील पिडीता ही तिच्या मित्रांसह रविवारच्या सुट्टीमध्ये फिरायला आली असताना तेथे आरोपी अभिषेक राजेश पारंगे हा सुध्दा त्याच्या साथीदारांसह फिरायला आला होता व त्याने पिडीता व तिच्या मित्रांजवळ जावून स्वतःची ओळख करून दिली व त्याने पिडीतेच्या जवळ जावून मला अॅटीट्युडवाली मुलगी आवडते असे म्हणून तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला व इतर साथीदारांनी पिडीताकडे बघून अश्लिल हावभाव करुन वेगवेगळे आवाज काढले व तिचा विनयभंग केला.
यावर पिडीतेने अलिबाग पोलीस ठाण्यात अभिषेक पारंगे, सुमित हरिश्चंद्र पवार, प्रथमेश राजू प्रभाले यांच्याविरुध्द तकार नोंदविली. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक एस. व्ही. भिसे व त्यांच्या सहकार्यांनी तपास पूर्ण केला. या खटल्यात अति. शासकीय अभियोक्ता स्मिता राजाराम धुमाळ-पाटील यांनी एकूण 3 महत्वाचे साक्षीदार तपासले. तसेच शासकीय अभियोक्ता भुषण साळवी यांनीही सर्व साक्षीदार तपासले. स्मिता घुमाळ या विशेष सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद महत्वपूर्ण ठरला. या खटल्यात अभिषेक पारंगे यास न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिन्याची शिक्षा व 2 हजसा 500 रूपये रकमेचा दंड शिक्षा ठोठावली आहे.