आयपीएलमध्ये फिक्सिंगचे प्रकरण उघड; एकास अटक

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये फिक्सिंगची बाब समोर आली आहे. आयपीएलचा सध्याचा सोळावा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या वेगवान गोलंदाजाला पैशाचं आमिष देण्यात आलं आहे. आरसीबी संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजशी संबंधित मॅच फिक्सिंगचं प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, एका ड्रायव्हरने फोनद्वारे मोहम्मद सिराजशी संपर्क साधला आणि त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची अंतर्गत माहिती देण्यास सांगितलं. मोहम्मद सिराजने ही माहिती बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली आहे.

आयपीएल बेटिंगमध्ये पैसे गमावल्यानंतर एका ड्रायव्हरने आरसीबीचा गोलंदाज सिराजशी संपर्क साधला आणि त्याच्याकडून संघासंबंधित माहितीची विचारणा केली. फिक्सिंग प्रकरणाबाबत सिराजने बीसीसीआयला माहिती दिली असून या संदर्भात तपास सुरु आहे. बीसीसीआयने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कडक आचारसंहिता बनवली आहे. कोणत्याही खेळाडूने किंवा अधिकार्‍याने बुकीशी संपर्क साधल्याची माहिती बीसीसीआयला दिली नाही, तर मंडळ त्याच्यावर कठोर कारवाई करू शकते. असे  यापूर्वीच सुचित केलेले आहे.

ड्रायव्हरने सिराजला सांगितलं की, जर सिराजने त्याला संघातील आतल्या गोष्टी सांगितल्या तर तो या खेळाडूला मोठी रक्कम देऊ शकतो. अधिकार्‍यांनी सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार, मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात संबंधित चालकाला अटक करण्यात आली आहे. त्यांनी पुढे माहिती देत सांगितलं की, सिराजने माहिती दिल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. आता त्याची चौकशी सुरू आहे. तपासानंतर अधिक माहिती समोर येईल, असे सांगण्यात आले.

Exit mobile version