| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
फ्लेमिंगो सिटीची संकल्पना जोपासण्यासाठी शहरातील चौकाचौकांत, रस्त्यांवर पालिकेने फ्लेमिंगोंचे शिल्प उभारले आहेत; मात्र स्वच्छ भारत अभियान स्पर्धा संपण्याच्या आतच या फ्लेमिंगोंचे रंग फिके पडल्याने पालिकेवर उपहासात्मक टीका होऊ लागली होती. पण आता 2023 च्या स्वच्छ भारत अभियानासाठी पालिका सज्ज झाली असून पांढर्या पडलेल्या बगळ्यांना पुन्हा गुलाबी रंगाचा साज चढवण्यात आल्याने चौकाचौकांत पुन्हा फ्लेमिंगो अवतरल्याचा भास नवी मुंबईकरांना होत आहे.
नवी मुंबई शहरातील नेरूळ, सीवूडस्, ऐरोलीच्या ठाणे खाडी किनारी, वाशी, बेलापूर इत्यादी ठिकाणच्या खाडीकिनारी पाणथळ जागेत मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो पक्ष्यांचा वावर आहे. शेकडो मैलांवरून शहरात येणार्या या स्थलांतरित पक्ष्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक, पर्यटक नवी मुंबई शहरात येत आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहराची अल्पावधीतच फ्लेमिंगो सिटी अशी ओळख झाली आहे. नवी मुंबई महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षण अभियानात ‘फ्लेमिंगो सिटी’ची ही संकल्पना अधोरेखित करण्यासाठी शहरातील चौकाचौकांत तसेच रस्त्याच्या दुभाजकात फ्लेमिंगो शिल्प बसवले आहेत.
गुलाबी रंगाचा नवा साज
स्वच्छ भारत अभियानात 2022 मध्ये पालिकेने गडद गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो बसवले होते; मात्र अवघ्या एक महिन्यात या फ्लेमिंगोंचा रंग उडू लागल्याने ते सफेद दिसू लागले होते. त्यामुळे हे फ्लेमिंगो आहेत की बगळे, असा सवाल नवी मुंबईकरांमधून उपस्थित होत होता. पण 2023 च्या स्वच्छ अभियानाची सुरुवात झाल्यापासून पालिकेने पुन्हा शहराची ओळख जपण्यासाठी गुलाबी रंगाचा साज चढवल्याने सर्वत्र फ्लेमिंगो अवतरल्याचा भास होत आहे.