बागायतदार शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण
| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे बहरु लागलेले आंबा पीक धोक्यात आले आहे. याशिवाय या वातावरणाचा भाजीपाला तसेच कडधान्यावरही परिणाम होऊ लागला आहे. यामुळे बागायतदार शेतकरी चिंतेत पडला आहे.
थंडीच्या सुरुवातीला आंबा पिकासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे आंब्याला मोहोर चांगल्या प्रकारे आला होता. तसेच येथील फळबागा कैर्या धरण्याच्या स्थितीत असताना अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे मोहोर काळवंडून जाण्याची शक्यता नाकारता येत नसून, कैर्याही गळून पडतील, असा अंदाज येथील शेतकर्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी रासायनिक फवारणीचा मार्ग अवलंबून आंब्याचा मोहोर व कैर्या वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
आंब्याप्रमाणेच भाजीपाला, फळावरही या ढगाळ वातावरणाचा चांगलाच परिणाम होण्याची भीती बागायतदार व शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. शेवग्याच्या झाडांना यावर्षी चांगल्या प्रकारे मोहोर व शेंगाही आलेल्या असताना ढगाळ वातावरणामुळे हा मोहोर गळू लागला आहे. वाल, चवळी, हरभरा, तुर, मुग, पावटा, घेवडा, कलिंगड व अन्य पिकांवर ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे, असे येथील बागायतदार शेतकरी संतोष चिर्लेकर, भास्कर ठाकूर, प्रफुल्ल खारपाटील, दत्तात्रेय म्हात्रे, कृष्णा केणी, हिराजी ठाकूर, दिलीप ठाकूर, अस्मित ठाकूर, अविनाश पाटील, कृष्णा म्हात्रे, गोपीनाथ गोंधळी, संतोष गोंधळी, हरिश्चंद्र गोंधळी, बळीराम म्हात्रे, रवींद्र ठाकूर तसेच येथील अन्य शेतकर्यांनी सांगितले.