पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा वाढता पाठिंबा
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
पाम बीच परिसरातील एनआरआय कॉलनीलगतच्या खाडीत दरवर्षी लाखोंच्या संख्येने दाखल होणारे लालसर रंगाचे फ्लेमिंगो सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून नवी मुंबईत येणाऱ्या या स्थलांतरित पक्ष्यांना पाहण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर पर्यटक, पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार येथे गर्दी करत आहेत.
सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत फ्लेमिंगोंचे सुंदर दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी छायाचित्रकारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. संपूर्ण परिसर गुलाबी रंगात न्हाऊन निघाल्याने पर्यटकही या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. मात्र, या परिसरात विकास प्रकल्प उभारण्याच्या चर्चेमुळे पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. “लाखो मैलांचा प्रवास करून येणाऱ्या फ्लेमिंगोंचा अधिवास धोक्यात घालून विकास कशासाठी?” असा सवाल पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत.
फ्लेमिंगोंचे संरक्षण करण्यासाठी विविध पर्यावरणवादी संघटना मैदानात उतरल्या असून, त्यांना नागरिकांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. हजारो नागरिकांनी सामाजिक माध्यमांसह विविध स्तरांवर “फ्लेमिंगो वाचवा, खाड्या वाचवा” अशी भूमिका घेतली आहे. निसर्ग आणि जैवविविधतेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत असून, प्रशासनाने विकासासोबत पर्यावरणाचाही समतोल राखावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
