पाच मीटर खोलवर वाहिन्या टाकण्यास परवानगी
| पनवेल | दीपक घरत |
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांमधून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी थेट समुद्रात सोडण्यासाठी खाडीपात्रातून सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम सुरु होते. नवी मुंबई विमानतळाशेजारी तरंगते हॉटेल सुरु करण्याच्या योजनेमुळे हे काम रखडले असून, खर्चातदेखील वाढ होणार असल्याने तरंगते हॉटेल तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी वाहिनीच्या कामात अडथळा ठरत आहे.
एमआयडीसीधील रासायनिक कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी औद्योगिक वसाहतीत प्रक्रिया केंद्र बांधण्यात आले आहे. या केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याची खोल समुद्रात विल्हेवाट लावण्यात येते. याकरिता कासाडी नदी पात्राकिनाऱ्यावरून वाघीवली खाडीपर्यंत सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, ही वाहिनी जुनी आणि जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी गळती लागून नदी आणि खाडी पात्रातील पाणी प्रदूषित होऊन जैवविविधता धोक्यात येत असल्याने होणारे हे प्रदूषण रोखण्यासाठी खाडी पात्रातून रबरी पाईप टाकण्याचे काम एमआयडीसीच्या माध्यमातून हाती घेण्यात आले होते. याकरिता नदी पात्रातील अडीच मीटर जमिनीखालून 630 व्यासाची नवीन वाहिनी टाकण्याची योजना हाती घेण्यात आली होती. याकरिता 84 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. सायन-पनवेल महामर्गावर कोपरा गावापर्यंतच्या खाडीत हे काम पूर्ण झाले आहे. मात्र, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पुढे तरंगते हॉटेल प्रस्तावित आहे. त्यामुळे महाराष्ट्र सागरी महामंडळाने पाईपलाईन आणखी दुपटीने खोल टाकण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प रखडला असून, त्याच्या खर्चातसुद्धा वाढ झालेली आहे. साडेअकरा कोटी रुपये आणखी खर्च करावा लागणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे या ठिकाणी फाइव स्टार आणि सेवन स्टार हॉटेल निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नवी मुंबई विमानतळाशेजारी वाघिवली खाडीत तरंगते हॉटेल बांधण्याचा प्रस्ताव यामुळे पुढे आला आहे. हॉटेलच्या बांधकामाकरिता सांडपाणी वाहिनी अडथळा ठरण्याची शक्यता असल्यानेच सांडपाणी वाहिनी आणखी काही मीटर खोल टाकण्याची सूचना मुंबई मेरीटाईम बोर्डकडून एमआयडीसीला करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
नियमानुसार पाच मीटर खालूनच वाहिन्या टाकण्याचे काम करणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने हे काम अडले आहे.
अरविंद म्हात्रे,
माजी नगरसेवक







