शेती पाण्याखाली जाऊन नुकसान; पाटबंधारे अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठण्यात सलग दुसऱ्या दिवशी पुराने हाहाकार उडविला असून, सोमवारी (दि.6) एस.टी स्थानक व छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर जलमय झाला. शासनाच्या पाटबंधारे खात्याच्या कोलाड विभागांतर्गत येणाऱ्या नागोठण्याजवळील पाटणसई येथील अंबा नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या (केटी) बंधाऱ्याचे दरवाजे पावसाळ्याच्या सुरुवातीला उघडले गेले नाहीत. त्यामुळेच बंधाऱ्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आडून राहिल्याने अंबा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली. त्यामुळे हे पाणी पाटणसई, बाळसई, वजरोली व परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात तुंबून राहिल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, पाठबंधाऱ्याच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने नागोठणे शहर व परिसरात पुराचे पाणी वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. नागोठण्यातील केटी बंधाऱ्याच्या एकूण 30 दरवाज्यांपैकी केवळ तीनच दरवाजे उघडले गेले आहेत. एकीकडे केटी बंधारा तुडुंब भरल्याने केवळ तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बंधाऱ्यातील किती पाणी वाहून जाणार हा प्रश्न आहे. अंबा नदीवरील केटी बंधाऱ्याचे दरवाजे पाटबंधारे कोलाड विभागाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी उघडण्यात येतात. याआधीही अनेकदा पाटणसई ग्रामपंचायत प्रशासनाच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाटबंधारे विभागाकडून बंधाऱ्याचे दरवाजे वर उचलण्यात आले आहेत. मात्र, यावर्षी सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी असताना बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याची तत्परता पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी दाखविली नाही. मात्र, पावसाने जोर पकडल्याने बंधाऱ्याचे दरवाजे उघडणे राहून गेल्याने बंधारा तुडुंब भरला. त्यामुळे बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात भराव वाहून जाऊन तेथून पाण्याचा मोठा प्रवाह नागोठण्याकडे वाहू लागला आहे. या पुरामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेले पाच ते सहा दिवसांपासून शेतातील राब पाण्याखाली गेल्याने ते कुजण्याची दाट शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.
दरम्यान, केटी बंधाऱ्याचे पाणी मागे उलटून गेल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील चिकणी, वाकण नाका, वाकण-बाळसई रस्ता व वाकण-पाली रस्ता शनिवारी रात्रीपासून पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणारे शेकडो प्रवासी, वाहन चालक महामार्गावर अडकून पडले आहेत. स्थानिक नागरिक त्यांना मदत करीत असले, तरी ते अजून किती मदत करणार? हा प्रश्न असल्याने सरकारी यंत्रणेकडून त्यांना वेळीच मदत पोहोचणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे केटी बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच न उघडण्यास जबाबदार असणाऱ्या पाटबंधारे खात्याच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
केटी बंधाऱ्याच्या शेजारील परिसरातील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना याआधीही अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. सद्य परिस्थितीतही पाटणसई व परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पाच ते सहा दिवसांपासून पाण्याखाली गेली आहे. केवळ पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळेच हे घडले आहे. त्यामुळे पूर ओसरताच रोहा तहसीलदार कार्यालयामार्फत नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी. तसेच, भविष्यात केटी बंधाऱ्याच्या कार्यक्षेत्रासाठी एक जबाबदार सक्षम अधिकारी नेमण्याची गरज आहे.
सदानंद गायकर,
माजी सभापती, पंचायत समिती रोहा
