एस.टी.बस स्थानकासह शहरातील सखल भागात व मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला पाणीच पाणी
|नागोठणे |प्रतिनिधी|
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यासह नागोठणे परिसराला अक्षरशः झोडपून काढले असतानाच गेले दोन-चार दिवसांपासून दुथडी भरून वाहणाऱ्या नागोठण्यातील अंबा नदीने शनिवार दिनांक ४ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली होती. यानंतर अगदी काही तासांतच रात्री नागोठणे अंबा नदीच्या काठावरील सकल भागातील एस.टी.स्थानक, आठवडा बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक व बाजारपेठ, बंगले आळी, श्री मरिआई मंदिरा समोरील मिनिडोर रिक्षा स्टँड व श्री मरिआई मंदिर परिसर, नागोठणे कोळीवाडा, हॉटेल लेक व्ह्यू समोरील परिसरात यावेळी पूराचे पाणी शिरले. या पुरामुळे अंबा नदीवरील ऐतिहासिक पुल पूर्णतः पाण्याखाली गेला होता.
भिसे खिंडीत दरड कोसळली
अतिवृष्टीमुळे नागोठणे रोहा मार्गावरील भिसे खिंडीत रात्री दरड कोसळली आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. नागोठणे पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी रविंद्र पारखे आपल्या पोलिस स्टाफसह घटनास्थळी गेले आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून ही दरड हटवण्याचे काम सुरू आहे.
नागोठणे शहर व परिसरातील वीजपुरवठा बंद
नागोठणे शहरात पुराचे पाणी आल्याने तसेच काही ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव महावितरण कडून नागोठणे शहर व परिसरातील वीजपुरवठा मध्यरात्री बंद करण्यात आला आहे.
वाकण - पाटणसई पेट्रोल पंप जवळील ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथील वीजपुरवठाही पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. पुराचे पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतरच वीजपुरवठा सुरळीत चालू होईल असे महावितरण कंपनीच्या नागोठणे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






