| पाली | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यासह इतर ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे दि.16 रोजी अंबा नदीला पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झाले. शाळेचा पहिला दिवस असतानाच भेरव येथील अंबा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने येथील विद्यार्थ्यांची मात्र शाळेला दांडी झाली.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे सुधागड तालुक्यातील अंबा नदीला पूर आला असून, भेरव येथील अंबा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शाळकरी विद्यार्थी व नोकरदारवर्गाची गैरसोय झाली. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिलाच दिवस होता. मात्र, स्कूल बस व एसटी बसेस नदीपलीकडे अडकून पडल्याने विद्यार्थ्यांची शाळेला दांडी झाली. पुलाच्या दोन्ही बाजूला नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पुराच्या पाण्याने वाहून आलेला कचरा, लाकडाचे ओंडे हे पुलावर अडकले. त्यामुळे पुलावर मातीचे व कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. मात्र, स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते अतिश सागळे, सतीश मांढरे यांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते ललित ठोंबरे यांच्या जेसीबीच्या सहाय्याने तो कचरा बाजूला करून वाहनांसाठी रस्ता मोकळा करण्यात आला व वाहतूक सुरळीत झाली.






