‘रानबाजिरे’चे बॅकवॉटर रिकामे न केल्याने महाडमध्ये पूरस्थिती?

‌ नैसर्गिक आपत्तीपूर्व उपाययोजनांकडे दुर्लक्ष

| पोलादपूर | प्रतिनिधी |

सक्षम सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे यंदा पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धरणातून बॅकवॉटर रिकामे करण्यात आले नव्हते. यामुळेच यंदा पोलादपूर शहरासह तालुक्यातील काही भाग तसेच महाड शहरात पुराचे पाणी साठल्याचे दिसून आले आहे.



पोलादपूर तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या महाड एमआयडीसी क्षेत्रासाठी पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने रानबाजिरे येथे 1993च्या दरम्यान धरण बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. यानंतर पूर्ण कार्यान्वित झालेल्या धरणाच्या बॅकवॉटरचा पुरवठा पोलादपूर तालुक्यातील कृषीक्षेत्र आणि पाणीपुरवठा योजनांना न होता थेट महाड एमआयडीसी क्षेत्रासाठीच केला गेला. धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी पोलादपूर तालुक्याची परिस्थिती झाली. मात्र, या धरणाचे पाणी वेळेआधीच ‌‘ओव्हरफ्लो’ झाल्यास महाड शहर आणि परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होत असल्याचे अनेकवेळा दिसून आले. गेल्यावर्षी या पूरस्थितीचा काळ लांबविण्यासाठी या रानबाजिरे धरणाचे बॅकवॉटर उन्हाळ्यामध्ये पूर्णत: रिकामे केल्यास सुरूवातीच्या पावसामुळे हे रिकामे धरण भरण्यास मदत होऊ शकेल. मात्र, ‌‘ओव्हरफ्लो’ होण्यास विलंब झाल्याने महाड शहर परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होणे टळू शकेल, असा विचार पुढे आल्याने 2022 मध्ये रानबाजिरे धरण रिकामे करण्यात आले होते. त्यामुळे ‌‘ओव्हरफ्लो’ लांबणीवर गेल्याने गेल्यावर्षी महाड शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली नाही.

मात्र, यंदा याबाबत प्रशासनामध्ये तहसिलदार आणि महाड प्रांताधिकारी या सक्षम अधिकाऱ्यांसह जुन्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाल्याने विशेषत: पुरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीबाबतचा अननुभवी अधिकाऱ्यांनी पोलादपूरचे रानबाजिरे धरण रिकामे करण्यासंदर्भात निष्काळजीपणा दाखविला आणि यंदा 2023 मध्ये केवळ सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दोन-तीन दिवसांत अनुक्रमे 132 मी.मी., 223 मी.मी. आणि 312 मी.मी. अशी पावसाने सरासरी 1891 मी.मी.ओलांडली असताना रानबाजिरे धरण ‌‘ओव्हरफ्लो’ होऊन पोलादपूर शहरासह तालुक्यातील काही भाग तसेच महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली. पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरण दरवर्षी मे महिन्याअखेरिस रिकामे केल्यास जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या अतिवृष्टीकाळात धरणाच्या बॅकवॉटरचा साठा भरून ‌‘ओव्हरफ्लो’ होण्यास विलंब होऊन पोलादपूर आणि महाड तालुक्यातील पूरस्थिती टळून दोन्ही तालुक्यातील आर्थिक आणि मालमत्तांची हानी टाळता येणार असल्याने या पावसाळयापूर्वीच्या उपायावर नियमित अंमलबजावणी होण्याची गरज व्यक्त होत आहे.

Exit mobile version