कोकणात दाणादाण, नद्यांना महापूर; बाजारपेठा बुडाल्या

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर गेलेल्या वरुणराजाने कोकणात जोरदार पुनरागमन केले आहे. रविवारपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर येथील अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून काही भागात ग्रामस्थ पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना समोर येत आहेत.

दरम्यान, हवामान खात्याने रायगड जिह्याला रेड अ‍ॅलर्ट तर रत्नागिरी, सिंधुदुर्गालादेखील ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला आहे.रविवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर बनली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर तालुका पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुस़र्‍यांदा शहराला वेढा घातला आहे. रविवारी रात्री उशिरा जवाहर चौकामध्ये धडक देणा़र्‍या पुराच्या पाण्याने सोमवारी सकाळपर्यंत ठिय्या मांडला आहे. जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा सुमारे सात तासांहून अधिक काळ शहराला वेढा राहिला आहे.

संततधार पावसाने पूरस्थितीमध्ये वाढ होत असून शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या पुराच्या पाण्याने व्यापा़र्‍यांची मात्र त्रेधातिरपीट उडविली आहे. राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी माहिती देताना सांगितले की, पुराच्या पाण्यात काींढेतड पुलाजवळून सोमवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास एकजण वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.
देवगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळणा़र्‍या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग खाडीला पूर आला आहे. तसेच सह्याद्री खो़र्‍यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने खारेपाटण येथील शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे खारेपाटण गावाला पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच खारेपाटण बाजारपेठेत जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. शीळ, गोठणेदोनिवडे-चिखलगाव आदी गावांचा संपर्क तुटला आहे. तर उन्हाळे, दोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी खारेपाटण-चिंचवली रस्त्यावर आले असून हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे येथील वाहतूक पूर्णतपणे बंद झाली आहे.

Exit mobile version