पुरामुळे भातशेतीचे, दुकानदारांचे नुकसान

| नागोठणे | प्रतिनिधी |

अंबा नदीला आलेल्या पुरामुळे सलग दोन दिवस नागोठणे शहरातील एसटी स्थानक परिसर, छ. शिवाजी चौक परिसर, बाजारपेठ, कोळीवाडा, बंगले आळी, मोहल्ला भागातील परिसर यांसह विविध भागाला व विभागातील अनेक गावांना पुराने दोन दिवस वेढा घातला होता. त्यामुळे नागोठणे शहरातील किराणा माल, कपडे, जनरल स्टोअर आदींसह विविध दुकानदारांचे दुकानातील माल भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच विभागातील भातशेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने राब कुजले आहेत. या पुरामुळे नागोठणे विभागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

नागोठणे विभागातील व नागोठण्याजवळ असलेल्या पाटणसई, वरवठणे, पिगोंडे, कोलेटी, पळस, कोंडगाव, ऐनघर, वांगणी आदी ग्रामपंचायत हद्दीतील गावांतील शेतकऱ्यांची अंबा नदीलगत असलेली शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊन नुकसान झालेे. त्यामुळे शासनाने या शेतीची त्वरित पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागोठणे विभागांतील शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान सध्या पुरामुळे नुकसान झालेली दुकाने व घरांचे पंचनामे लवकरच सुरु करण्यात येतील. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे हे कृषी खाते, तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून संयुक्तपणे होतील, असे रोहा तहसील कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version