शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान
| कोलाड | प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील बाहे गावातील शेतकरी राजेश पांडुरंग थिटे यांच्या शेळ्यांच्या शेडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने 6 ते 7 बकऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच शेजारील कोंबडी शेड कोसळल्याने काही गावठी कोंबड्याही दगावल्या. या घटनेमुळे थिटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावर्षी पाऊस कमी पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासून गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुंडलिका व महिसदरा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या परिसरात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी (दि. 5) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महिसदरा नदीच्या काठावरील राजेश थिटे यांच्या शेळ्यांच्या शेडमध्ये पुराचे पाणी घुसले. शेडमध्ये सुमारे 60 ते 70 बकऱ्या होत्या. त्यापैकी 6 ते 7 बकऱ्या पुराच्या पाण्यात दगावल्या. तसेच शेजारील बॉयलर कोंबड्यांची शेड कोसळल्याने काही गावठी कोंबड्यांचाही मृत्यू झाला. पावसाळ्यामुळे बॉयलर कोंबड्या नसल्याने मोठी हानी टळली असली, तरी बकऱ्या व गावठी कोंबड्यांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शासनाने योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी राजेश पांडुरंग थिटे यांनी केली आहे.
