। पंढरपूर । वृत्तसंस्था ।
चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभार्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या फुलांच्या सजावटीसाठी शेवंती, अष्टर, गोंडा, गुलाब, जिप्सी या फुलांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिली. मराठी नव वर्षाच्या पहिल्या दिवशी विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातून भाविक पंढरीत दाखल झाले आहे. फुलांची आरास आणि सणा निमित्तच्या पोशाखामुळे सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून आले आहे.
येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. या साठी शेवंती 200 किलो, अष्टर 80 किलो, गोंडा 150 किलो, गुलाब 100 गड्डी, जिप्सी 10 गड्डी या फुलांचा वापर करण्यात आला आहे. या फुलांच्या रंगसंगतीने आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हि सजावट विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील रा. रांजणगाव महागणपती यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली आहे. या सजावटीचे काम श्री फ्लॉवर्स, पुणे यांनी केले आहे. यासाठी 15 कामगारांनी परिश्रम घेतले. हिंदू नववर्षारंभ निमित्त राज्यातून भाविक दर्शनासाठी आले आहेत. यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेत विविध सोयी सुविधा दिल्या आहेत. दर्शन रांगेत भाविकांसाठी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पत्रा शेड व पायाखाली कार्पेट अंथरले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.