आयोगाने दाखवला हिरवा कंदील; ग्राहकांच्या खर्चात होणार बचत
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक वीजग्राहकांना दिलासा मिळणार असून, एक एप्रिलपासून वीजबिल कमी होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी व बेस्टसह अन्य वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास आयोगाने शुक्रवारी मध्यरात्री मंजुरी दिली. स्मार्ट मीटर (टीओडी) बसविणार्या औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच आणि रात्री बारा ते सकाळी सहापर्यंतच्या वीजवापरास 10-30 टक्के वीजदर सवलत मिळेल, मात्र सायंकाळी पाच ते रात्री 10-12 वाजेपर्यंतच्या वीजवापरासाठी 20 टक्के जादा मोजावे लागतील. म्हणजे त्यांना एका हाताने दिलेला लाभ दुसर्या हाताने काढून घेतला जाईल.
महावितरण व अदानी कंपनीचे वीजदर एक एप्रिलपासून सरासरी 10 टक्के, टाटा कंपनीचा 18 टक्के तर बेस्टचा वीजदर 9.82 टक्के कमी होईल. पुढील पाच वर्षात अपारंपारिक क्षेत्रातील सौर व अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने वीजदर कमी होणार आहेत. मात्र, कृषीग्राहकांसाठी औद्योगिक, वाणिज्यिक व अन्य ग्राहकांवर पडणारा क्रॉस सबसिडीचा बोजा एक एप्रिलपासून पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे वीजदर कमी होऊन दिलासा मिळणार आहे. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी निवासी हॉटेल्स, गेस्ट हाऊस आदींना वाणिज्यिक ऐवजी औद्योगिक ग्राहकांच्या श्रेणीत टाकण्यात आले असून त्यांचे वीजबिल लक्षणीय कमी होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधान सूर्यघर योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असून ती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचविण्याचे केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारलेल्या घरगुती वीज ग्राहकांनी दिवसा निर्माण केलेली अतिरिक्त वीज महावितरणला पुरवून त्यांच्या अन्य वेळच्या वीजवापरातून त्याची वजावट मिळत होती. त्यामुळे या ग्राहकांना शून्य वीजबिल येईल, असा प्रचार झाला व योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, दिवसा निर्माण होणार्या अतिरिक्त वीजेची वजावट कमाल वीज मागणीच्या काळात (सायंकाळी पाच ते रात्री 10) मिळणार नाही, असे महावितरणने प्रस्तावित केले होते. मात्र, त्यास आयोगापुढील सुनावणीत व इतरांनीही जोरदार विरोध केला. या योजनेवर कोणताही परिणाम होणार नाही.