लाल मातीमध्ये फुलला उसाचा मळा

राजापूर । वृत्तसंस्था ।
घाटमाथ्यावरील काळ्या मातीमध्ये रूजवात होणार्या ऊसाचा गोडवा कोकणातील लाल मातीमध्ये बहरत चालला आहे. केवळ बहरत नसून ऊस लागवडीच्या क्षेत्रामध्ये वर्षागणिक होत असलेली लक्षणीय वाढ पाहता तो अधिकच वृद्धींगत होताना दिसत आहे. भातशेतीकडे काहीसे दुर्लक्ष करणार्‍या शेतकर्‍याचा ऊस लागवडीकडे वाढता कल पाहता त्यातून कोकणच्या कृषीक्षेत्राला भविष्यामध्ये नव्या ओळखीचा वेगळा आयाम मिळण्याचे संकेत त्यातून मिळत आहेत. घाटमाथ्याच्या तुलनेमध्ये कोकणातील ऊस लागवडीखालील क्षेत्र कमी असले तरी, त्याची वर्षागणिक वाटचाल ‘एक पाऊल पुढे’ दिसत आहे. त्याला पिक विम्याचे कोंदण मिळाल्यास ऊसाचा गोडवा अधिकच अविट होण्यास मदत होईल.
लहरी पावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने कोकणातील शेतकर्यांकडून शेतीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसते. याला केवळ पावसाचा लहरीपणा कारणीभूत नसून खर्चाच्या तुलनेमध्ये न मिळणारे उत्पन्न, जंगली श्‍वापदांकडून होणारी नासधूस, शेती कामे करणार्या मजुरांची कमतरता, आधुनिकता अन् व्यवसायिक दृष्टीकोनाचा अभाव आदी विविध कारणांचाही समावेश आहे. अशा स्थितीमध्ये शेतकर्यांकडून हमखास उत्पन्न देणार्‍या ऊसाच्या पिकाची निवड करून येथील नव्या पर्यायाचा शोध घेतल्याचे आश्‍वासक चित्र दिसत आहे. त्यातून, दरवर्षी ऊसाच्या पिकाखाली येणार्या क्षेत्रफळाची वाढ होत असल्याचे चित्र असून राजापूर तालुक्यामध्ये सुमारे ऐशी शेतकर्‍यांनी ऊसाची लागवड केली आहे.

Exit mobile version