सिंधुदुर्ग, गोवा, जळगावसह अगत्तीला थेट विमानसेवा
| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या देशांतर्गत हवाई सेवेत ‘फ्लाय 91’ या विमान कंपनीची भर पडली आहे. गोवा मुख्यालय असलेल्या या कंपनीच्या विमानाचे नवी मुंबई विमानतळावर प्रथमच आगमन झाले. हैदराबादहून आलेल्या विमानाचे विमानतळ प्रशासनाकडून जलतोफेच्या सलामीने स्वागत करण्यात आले.
‘फ्लाय 91’च्या हिवाळी वेळापत्रकानुसार नवी मुंबईहून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि लक्षद्वीपमधील अगत्ती या चार ठिकाणी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह गोवा आणि पश्चिम किनारपट्टीवरील पर्यटन व व्यावसायिक प्रवासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. नवी मुंबई हे ‘फ्लाय 91’चे देशातील 14वे आणि महाराष्ट्रातील पाचवे गंतव्यस्थान ठरले आहे. कंपनीच्या हवाई जाळ्यात गोवा, सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, अगत्ती, कोची, हुबळी, राजमुंद्री, विजयवाडा आणि तिरुपती या शहरांचा समावेश आहे.
‘फ्लाय 91’ने विस्ताराच्या दृष्टीने 40 एटीआर-72-600 विमानांची ऑर्डर दिली आहे. सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलरच्या या ऑर्डरची पूर्तता 2027 ते 2032 या कालावधीत होणार आहे. त्यामुळे कंपनीचा ताफा सध्याच्या सहा विमानांवरून 60 विमानांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 32 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. 25 डिसेंबर 2025 रोजी सेवा सुरू झाल्यानंतर विमानतळाच्या प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ झाली आहे. सुरुवातीला 13 गंतव्यस्थानांशी जोडणी असलेल्या विमानतळावर आता सुमारे 43 देशांतर्गत गंतव्यस्थानांशी हवाई संपर्क उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत 25 हजार 295 हून अधिक व्यावसायिक विमानफेऱ्या झाल्या आहेत. वाढत्या हवाई जोडणीमुळे नवी मुंबई विमानतळ मुंबई महानगर प्रदेशासह पश्चिम भारतातील प्रमुख विमान वाहतूक केंद्र म्हणून आकार घेत आहे.
