नांदगाव, मुरुडच्या किनार्‍यावर हवेतून फेसाचे गोळे

अकल्पित घटनेची नोंद!
नांदगाव | उदय खोत |
नांदगाव व मुरुडच्या समुद्रकिनारी शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास एक अघटित परंतु जागतिक घटना घडली.समुद्री फेसाचे गोळेच्या गोळे हवेत तरंगत असलेले अनेकांच्या दृष्टीस पडले. हवेत कापूस जसा तरंगत उडत जावा तशा प्रकारचे हे फेसाचे गोळे पकडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले तर बच्चे कंपनीचाही मग खेळ रंगला पण तो काही काळापुरताच !

शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास नांदगाव व मुरुड समुद्र किनार्याच्या मध्येच असलेल्या मोरे गावच्या किनारपट्टीच्या टोकाकडील खडकांच्या बाजूने वाहणार्‍या वार्‍यांनी हे समुद्री फेसाचे गोळे(सी फोम) हवेत उडत येतांना दिसले. ते बघता बघता किनार्‍यासह दूरवर गावाकडील भागातही पसरल. सावरीचा हलका कापूस वार्‍यावर उडत आल्याचा भास कित्येकांना झाला.अनेकजण त्याला पकडण्यासाठी धाव घेतली परंतु तो कापूस नसून फेसाचा गोळा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नांदगावच्या बाजारपेठ नाक्यावरही हे फेसाचे गोळे धडकले आणि निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी लोक घराबाहेर पडले.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कित्येकांनी हेलिकॉप्टरव्दारे सॅनिटायझरची फवारणी केली जात असल्याची शंकाही व्यक्त केली.सदर प्रकार काही वेळेपर्यंत चालला व नंतर बंद झाला.

समुद्री फेस( सी फोम) ही एक समुद्रातील नैसर्गिक हालचाल असून ती एखाद्या चक्रीवादळानंतर तटीय आंदोलनाव्दारे होते.त्यात उच्च आर्द्रता असते.तपकिरी रंगाच्या खडकातील कार्बनिक पदार्थांना भेदून (प्रोटीन,लिनिन तथा लिपिड)अपतटीय तुटल्यामुळे स्त्रोतांपासून तयार होते.शेवाळ फुलते समुद्राच्या पाण्याचे मंथन होते फेस तयार होतो.जोरदार वार्‍याबरोबर हा फेस वर उडू लागतो. आजुबाजूचे गोडे पाणी व समुद्राचे खारे पाणी जेथे मिळते तेथे ही प्रक्रिया घडून येते.कमी घनतेमुळे हे फेसाचे गोळे हवेत दूरवर उडून विरघळून जातात.

Exit mobile version