| नेरळ | प्रतिनिधी |
लांबलेला पावसाळा परतीच्या वाटेवर असल्याचे चित्र सकाळच्या वेळी धुक्याची दुलई दिसून येऊ लागल्याने जाणवत आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागली असून, मागील काही दिवस सुरु असलेला पावसाचा खेळ संपून खऱ्या अर्थाने हिवाळी सुरु झाल्याने या हंगामाचे स्वागत होऊ लागले आहे. माथेरानचे तापमान 15.04 अंशावर आले असल्याने तेथे गुलाबी थंडी अनुभवास मिळू लागली आहे.
यावर्षी पाऊस नोव्हेंबर महिना सुरु झाला तरी थांबण्याचे नाव घेत नव्हता. अखेर मे महिन्यात सुरु झालेला पावसाळा नोव्हेंबर महिन्याचे दुसऱ्या आठवड्यात परतीच्या मार्गावर असल्याचे आशादायक चित्र कर्जत तालुक्यात दिसून येऊ लागले आहे. सहा महिने पावसाने झोडपून काढल्याने यावर्षी थंडी सुरु होणार कि नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत थंडीची सुरुवात होते, मात्र यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अति मुसळधार पाऊस कोसळला त्यामुळे सहा महिन्यापर्यंत लांबलेला पाऊस थांबणार कि नाही अशी भीती व्यक्त होत होती. सप्टेंबर महिन्यात तयार होणारी भाताची शेती यावर्षी पावसाच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे यावर्षी थंडीचे महिने नक्की कोणते? हिवाळा हंगाम यावर्षी असणार कि नाही? यावर चर्चा होत होत्या.
अखेर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात धुक्याची दुलई दिसून येऊ लागली आहे. सकाळच्या वेळी चालण्यासाठी मॉर्निंग वॉक निघणाऱ्याना सुखद धक्का मिळत आहे. थंडीची चाहूल लागल्याने आणि मागील दोन दिवस सकाळचे वेळी थंडी अनुभवता येऊ लागल्याने सकाळच्या वेळी चालण्यासाठी घराबाहेर पडणारे यांची संख्या वाढली आहे. त्यात माथेरानमध्ये हिवाळ्यात गर्दी पर्यटक हे गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. माथेरानमधील आजचे तापमान हे 15 अंशावर खाली आल्याने थंडीची चाहूल दिसून येत आहे. माथेरानमधील थंडी पर्यटकांना आपल्याकडे खेचून येणारी असल्याने गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पाऊले वळतील असा आशावाद माथेरानमधील व्यावसायिकांना आहे.
कर्जतमध्ये धुक्यामुळे आनंदाचे वातावरण
