परतीच्या पावसाचा वाहतुकीवर परिणाम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दिवाळीच्या सुट्टीनंतर पर्यटक परतीच्या मार्गावर निघाले आहेत. रविवारी परतीच्या मार्गावर असलेल्या प्रवाशांनी अलिबाग स्थानकात प्रचंड गर्दी केली होती. पनवेलपर्यंत जाण्यासाठी विना थांबा बसचे तिकीट काढण्यासाठी अलिबाग स्थानकात भलीमोठी रांग लागली होती.
दिवाळीची सुट्टी पडल्याने पर्यटक अलिबागध्ये दाखल झाले आहेत. काही जण मित्र मंडळींसह तर काहीजण कुटूंबिंयासमवेत अलिबागध्ये फिरण्यासाठी आले होते. यावेळी अलिबागसह वरसोली, नागांव, समुद्रकिनारी पर्यटकांनी अलोट गर्दी केली होती. सुट्टीचा हंगाम संपल्यानंतर पर्यटक रविवारी (दि.26) दुपारपासून परतीच्या मार्गावर निघाले. परंतु, गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले असून, रविवारी दुपारपासून पावसाने सुरुवात केल्याने परतीच्या मार्गावर लागलेल्या पर्यटकांची तारांबळ उडाली. वाहतुकीवरही त्याचा मोठा परिणाम झाला. दरम्यान, अलिबाग-वडखळ मार्गावर वाहतूक कोंडीशी सामना करण्याची वेळ प्रवाशांसह पर्यटकांवर आली होती.
तसेच, पावसामुळे प्रवासी बोटी बंद असल्याने एसटीवर त्याचा भार पडला. अलिबाग एसटी स्थानकात तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची रांगच रांग दिसून आली. परंतु, पनवेलकडे जाणारी विना थांबा बस वेळेवर लागली नसल्याने प्रवाशांना तासनतास स्थानकात उभे राहवे लागले. प्रवाशांच्या गर्दीचा विचार करता, अलिबाग एसटी आगाराने ज्यादा बसेसची व्यवस्था केली आहे. परंतु, वाहतूक कोंडीमुळे अनेक बसेस रस्त्यातच अडकल्यामुळे त्यांना निश्चित स्थळी वेळेवर पोहचण्यास विलंब झाला. त्यामुळे अलिबाग स्थानकातून ज्यादाबसेस उशीरा सुटल्याचे चित्र दिसून आले.
प्रवाशांच्या गर्दीचा विचार करता, ज्यादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, वाहतूक कोंडीमुळे अनेक बसेस रस्त्यातच अडकल्या. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्या बसेस येतील त्यामध्ये प्रवाशांना बसवून त्यांच्या निश्चित स्थळी सोडण्याचा प्रयत्न केला गेला.
राकेश देवरे,
आगार व्यवस्थापक, अलिबाग







