नुतनीकरणाकडे बांधकाम विभागाची पाठ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वंचित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी गोंधळपाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्यात आले होते. परंतु, काही वर्षातच ही इमारत धोकादायक झाल्याने येथील अनेक कार्यालये पुर्ण खाली करण्यात आली. मात्र, या इमारतींच्या दुरुस्तीसह नुतनीकरणाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठ फिरविल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सार्वजनिक न्याय भवन दुर्लक्षीत झाले असून एका छताखाली मळिणाऱ्या सुविधांपासून मागासवर्ग दुरावला आहे.
अनुसूचित जाती, नवबौध्द घटकांच्या सामाजिक, शैक्षण्कि व आर्थिक उन्नतीसाठी सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य विशेष सहाय्य विभागामार्फत अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बांधण्यात आले. त्यासाठी सुमारे 7 कोटीहून अधिक रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. या इमारतीचा उद्घाटन सोहळा 15 ऑगस्ट 2014 रोजी झाला. त्यात तळमजल्यावर मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, संत रोहीदास चर्माद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महांडळ, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ ही सहा कार्यालये, पहिल्या मजल्यावर समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालय, सभागृह व कर्मचाऱ्यांचे कार्यालय आणि दुसऱ्या मजल्यावर जात पडताळणी कार्यालय सुरु करण्यात आले. या इमारतीतून वंचित घटकांचा सर्वांगिण विकास होण्याची आशा पल्लवीत झाली होती. परंतु, उद्घाटन होऊन अवघ्या चार वर्षांतच इमारतीचा स्लॅब कोसळू लागला, भिंतीना तडे पडू लागले, पावसाळ्यात गळती होऊ लागली. त्यामुळे ही इमारात अनेक समस्यांच्या गर्तेत सापडली. तसेच, इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी, कामानिमित्त येणार विद्यार्थी व नागरिकांची सुरक्षा धोक्यात येण्याची भ्तीि निर्माण झाली होती. स्ट्रक्चरल ऑडीटनंतर इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संपुर्ण कार्यालय खाली करण्याची वेळ आली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ही कार्यालये खासगी जागांमध्ये भाडे तत्वावर कार्यरत आहेत. त्याचा नाहक त्रास वंचित घटकांसह कर्मचाऱ्यांना होत आहे.
गेल्या तीन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतीच्या दुरुस्तीसह नुतनीकरणाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ही इमारत दुर्लक्षीत झाली आहे. नव्याने इमरी बांधण्याच्या भमिकेकडे देखील दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सामाजिक न्याय भवनची जागा पडिक होऊ लागली आहे. त्याठिकाणी गवत व विषरी प्राण्यांचा वावर वाढू लागला आहे. दरम्यान, या इमारतीच्या नुतनीकरणाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठ फिरविल्याने मागास घटकांच्या विकासाला अडकाठी आल्याचे बोलले जात आहे.
गोंधळपाडा येथे उभारण्यात आलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामजिक न्याय भवनची इमारत जीर्ण झाली आहे. त्या इमारतीच्या जागी नवीन इमरीत बांधण्याची कोणतीही हालचाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिसून येत नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे. एका छाताखाली योजनांसह विविध शासकिय कामे मागासवर्गीय घटकांची होत असतं. परंतु, आता कार्यालये विखुरल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे. सार्वजिक बांधकाम विभागाने ही इमारत बांधण्यासाठी हालचाल सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
–प्रदिप ओव्हाळ,
अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ, रायगड
सामाजिक न्याय भवन इमारतीच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परंतु, समाजकल्याण विभागाकडून त्यास नकार देऊन नव्याने इमारत बांधण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम थांबले आहे.
-विनायक तेलंग,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग





