रस्ते अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी वेगमर्यादा पाळा

सहा. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र घरत यांचे प्रतिपादन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
वाहनांची संख्या प्रंचड वाढली असून, त्या पद्धतीने रस्ते तयार झालेले नाहीत. तथापि रस्ते अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी वाहनांची वेगमर्यादा, ओव्हर टेकिंगच्या चुकीच्या पद्धतीने न करता स्वसुरक्षेइतकीच इतरांची सुरक्षा राखली पाहिजे, असे प्रतिपादन मुरुड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र घरत यांनी केले. मुरुड आगारातर्फे दि .11 ते 25 जानेवारी या सुरक्षितता मोहिम कार्यक्रमांर्तगत वाहक -चालक व कार्यशाळेतील कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र घरत, आगार व्यवस्थापक सनिल वाघचौरे, प्रा. एम.एस. जाधव, पर्यवेक्षक गौतम भोसले, पो.कॉ. अविनाश झावरे, मुंबई मुख्यालय भांडारपाल संपदा संखे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात आगार व्यवस्थापक सनिल वाघचौरे म्हणाले की, अपघात हा अपघात असतो. ते टाळण्यासाठी विशेषतः चालकांनी सदैव सावधगिरी बाळगून अपघाताचे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणले पाहिजे. वर्षानुवर्ष अपघात नुकसान भरपाईचे दावे चालतात आणि महामंडळाला दाव्यांची मोठी रक्कम चुकवावी लागते. त्यासाठी चालकांनी व्यसनांपासून दूर राहावे असा सल्ला देत यांत्रिक दोषांमुळे अपघात होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे सुचित केले. एसटी बसमध्ये नेमका दोष हेरून यांत्रिक विभागात योग्य प्रकारे तक्रारी नोंदवून सहकार्य करावे, अशी विनंती केली. दीप प्रज्ज्वलनाने सुरक्षितता मोहिमेचा मान्यवरांचे उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. चालक मिलिंद वाणी व वाहक संदीप चांदोरकर यांचा प्रतिनिधिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश पाटील यांनी केले.

Exit mobile version