लंपी आजारावर ‌‘फूडग्रेड’ रामबाण

पदवीधर तरुणाने तयार केले देशी औषध

| नेरळ | प्रतिनिधी |

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना लंपी आजारामुळे मोठ्या प्रमाणावर दुभती जनावरे आणि बैल गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील बार्डी गावातील पदवीधर तरुण हेमंत कोंडिलकर यांनी लंपीसदृश आजारावर उपयुक्त ठरणारे ‌‘फूडग्रेड’ नावाचे देशी औषध विकसित केले आहे. हे औषध पशूंमध्ये वाढत्या उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासावर तसेच लंपीच्या लक्षणांवर मदतगार ठरत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयोग करणारे हेमंत कोंडिलकर यांनी मागील काही वर्षांपासून पशुधन संरक्षणासाठी संशोधन सुरू ठेवले. दोन वर्षांच्या प्रयोगानंतर त्यांनी ‌‘फूडग्रेड’ हे वैदिक पद्धतीने तयार केलेले औषध शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले. कर्जत आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या औषधाचा वापर केला असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे.

लंपीसारख्या आजारांवर उपचारासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यावर पर्याय म्हणून अल्प दरात हे औषध उपलब्ध करून देण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील तब्बल 47 बैलांना या उपचारामुळे दिलासा मिळाल्याचा दावा हेमंत कोंडिलकर यांनी केला आहे. सध्या वाढत्या तापमानाचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावरही होत आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी जपत ‌‘फूडग्रेड वैदिक अमृत’ तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‌‘फूडग्रेड' वापरण्याची पद्धत
गुरांच्या पाण्यात मिसळून किंवा खुराकातून देता येते.
डोस
लहान वासरांसाठी : 200 मिली दिवसातून दोन वेळा
मोठ्या गुरांसाठी : 500 मिली दिवसातून दोन वेळा
फायदे
शरीरात गारवा निर्माण होण्यास मदत.
पचनसंस्था सुधारण्यास सहाय्य.
वैदिक पद्धतीने तयार केल्याने दुष्परिणाम नसल्याचा दावा

शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी गेली काही वर्षे संशोधन करत होतो. फूडग्रेडच्या वापरामुळे अनेक जनावरांना दिलासा मिळाला आहे. पुढील काळात अधिक शास्त्रीय पातळीवर यावर काम करण्याचा प्रयत्न राहील.

हेमंत कोंडिलकर,
संशोधक तरुण
Exit mobile version