। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आ. धैर्यशील पाटील यांनी आक्रमक भुमिका घेत अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयात धाव घेतली. तसेच शेतकर्यांना नुकसानीची भरपाई देण्याची मागणी संबंधित अधिकारी व अभियंत्यांकडे केली.
रोहा तालुक्यातील कोलाड पाटबंधारे विभागाचा मनमानी कारभार गेली पाच वर्षे सुरु आहे. पुगाव, पुई येथील शेतकर्यांना पाटबंधारे विभागाकडून अद्यापही शेतीची नुकसानभरपाई मिळालेली नाही.
कोलाड पाटबंधारे खात्याकडून आरसीएफ कारखान्यासह अन्य कारखान्यांना बारमाही पाणीपुरवठा करण्यात येतो. पाईपलाईनच्या गळतीमुळे शेतकर्यांना उन्हाळी भातशेती लागवड करता येत नाही. याबाबत गुरवारी (दि.15) अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयात धाव घेत माजी. आ. धैर्यशील पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी केलली.
तसेच पाटील यांनी शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचा पाढा वाचत त्यांच्या बाजूने सविस्तर माहिती देत चर्चा केली. यावर अभियंता यांनी नुकसान भरपाई मिळावी, याबाबतचा प्रस्ताव कार्यालयाकडून जून 2022 रोजी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असल्याचे सांगितले. तसेच आक्टोबर 2022 पर्यंतची नुकसान भरपाईची रक्कम तहसीलदार, रोहा यांच्याकडे जमा होईल, असे आश्वासन दिले.
यावेळी कुणबी समाजनेते व रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाचे ज्येेष्ठ नेते शंकरराव म्हसकर, मुठवली सोसायटीचे चेअरमन गणेश म्हसकर, संजय ननवरे, संतोष माने व शेतकरी उपस्थित होते.