धुळ्यात प्रथमच महिलेला उमेदवारी

| धुळे | प्रतिनिधी |

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापत चालले आहे. उमेदवारांचे कुटुंबही अंगाची काहीली होणाऱ्या उन्हात ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत. स्वातंत्र्यानंतर अवलोकन केले असता काँग्रेसने या मतदारसंघातील निवडणुकीत 72 वर्षांत प्रथमच महिलेला उमेदवारी देत मतदारांचे लक्ष वेधले आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघातील पहिल्या महिला उमेदवाराचा मान डॉ. शोभा बच्छाव यांनी पटकावला आहे. त्या पक्षांतर्गत उमेदवारीच्या स्पर्धेत नव्हत्या. त्यांचे उमेदवार म्हणून नाव चर्चेत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपूर्वी पक्षश्रेष्ठींकडून त्यांचे नाव जाहीर झाले. प्रचाराच्या कमी कालावधीत मतदारसंघातील प्रस्थापितांचे आव्हान पेलण्याची महिला उमेदवार म्हणून डॉ. बच्छाव यांच्या कसोटीचा हा काळ ठरतो आहे. मतदारसंघातील घडामोडींचा वेध घेत जेव्हा काँग्रेस आणि भाजप, अशा सरळ लढतीवर शिक्कामोर्तब झाल्यावर डॉ. बच्छाव यांचे कुटुंब प्रचारात जुंपले आहे.

Exit mobile version