तुषार गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुका दळण-वळणाच्या दृष्टीने आता विकसित होत चालला आहे. उरणला रेल्वे सेवा सुरु झाली, लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा सुरु होणार आहे. दरम्यान, उरणमधून मुंबई कुलाबा व नवी मुंबई जाण्यासाठी मुंबई महानगर पालिका परिवहन सेवेची बेस्ट सेवा सुरु करण्यात यावी, अशी अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी होती. ती मागणी आता पूर्ण झाली आहे.
उरणमधील द्रोणागिरीतील सामाजिक कार्यकर्ते तुषार गायकवाड यांनी उरण ते अटल सेतू मार्गे मुंबई या मार्गावर बेस्ट बस सेवा सुरु करण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आले असून, बेस्ट प्रशासनाने उरण ते बांद्रा स्टेशन (पुर्व), उरण ते अटलसेतू मार्गे कुलाबा व उरण ते वाशी अशी बस सेवा सुरु केली आहे.
उरणच्या इतिहासात पहिल्यांदाच उरण ते नवी मुंबई व मुंबई अशी बस सेवा सुरु झाली आहे. त्याचे श्रेय उरणकरांनी सामाजिक कार्यकर्ते तुषार गायकवाड यांना दिले आहे. शुक्रवारी (दि.14) सकाळी 9 वाजता द्रोणागिरी सेक्टर 12 येथून पहिली व दुसरी बस मुंबई व नवी मुंबईकडे रवाना झाल्या. या बसेसचे स्वागत तुषार गायकवाड यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष नामदेव कुरणे, भूपाळी सोसायटीचे अध्यक्ष दिनेश पवार, भैरवी सोसायटी अध्यक्ष नवनाथ डोके, लक्ष्मण मोटे, तुकाराम खंडागळे, सोसायटीतील नागरिक व ग्रामस्थांनी केले. तर, बेस्ट प्रशासनाच्यावतीने परिवहन सेवा चलो बस सेवेचे इन्स्पेक्टर भागवत कांबळे व प्रमोद कोकरे उपस्थित होते.
उरणला एसटी महामंडळच्या बसेसच्या फेऱ्या कमी आहेत. शिवाय त्या फेऱ्या वेळेत नाहीत. नागरिकांना कुठेही वेळेत प्रवास करता येत नाही. तसेच, रेल्वे सेवा फक्त नवी मुंबई पर्यंतच आहे. त्यामुळे दररोज उरण-मुंबई-उरण असा प्रवास करणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचारी, खासगी कंपनीतील अधिकारी-कर्मचारी, व्यापारी व उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. सध्या सिडको जेएनपीटी ते नवी मुंबई, मुंबई आणि ब्रांद्रा स्टेशन पुर्व असा प्रवास बेस्टच्या बसने करता येणार आहे. बस मार्गाचा नंबर चलो ॲपमध्ये दाखवत आहे. त्यामुळे उरणकरांच्या वेळेची बचत होणार आहे. उरणच्या इतिहासात पहिल्यांदाच बेस्ट बस सेवा सुरु झाल्याने नागरिकांनी, प्रवासी वर्गाने बेस्ट प्रशासनाचे व तुषार गायकवाड यांचे आभार मानले आहेत.
प्रवाशांचा सुखकर प्रवास
ही ‘बेस्ट' सेवा रविवार खेरीज सिडको जेएनपीटी ते नवी मुंबई, बांद्रा रेल्वेस्टेशन पूर्व व अटलसेतू मार्गे कुलाबा या मार्गावर सुरु करण्यात आली आहे. तसेच, सिडको जेएनपीटी ते वाशी, वाशी ते सिडको जेएनपीटी अशी स्वतंत्र बस सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे उरणकरांचा प्रवास वातानुकुलीत, आरामदायी, जलद आणि सुरक्षित होणार आहे.
बससेवेचा लाभ घेण्यासाठी ‘चलो'
कोणत्याही नागरिकांना या बससेवेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी मोबाईलमध्ये ‘चलो' बस ॲप डाउनलोड करून त्यात आपल्या प्रवासाची ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. अन्यथा बसमधून प्रवास करता येणार नाही. तसेच, बस तिकीटाची रक्कम ऑनलाईन बुकींग करतेवेळी दिसून येईल. ही बुकिंग 24 तास उपलब्ध आहे. त्याचबरोबर या बस सेवेचे वेळापत्रक देखील या ‘चलो' बस ॲप वर पाहता येणार आहे. तसेच, या ॲपवर कोणती बस कुठे आहे, हे देखील त्वरीत कळते.
गेल्या अनेक वर्षांपासून उरणमधील नागरिकांना मुंबई व नवी मुंबई मध्ये प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे प्रवासी वर्गांच्या अडचणी कमी व्हाव्यात, प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना जलद व उत्तम सेवा मिळावी यासाठी माझे प्रयत्न चालू होते. बेस्ट प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार, पाठपुरावा सुरु होता. प्रवाशांची मागणी लक्षात घेता आता उरणमधून मुंबई व नवी मुंबई जाण्यासाठी बेस्ट प्रशासनाने बस सेवा सुरु केली आहे. त्यामुळे मी बेस्ट प्रशासनाचे आभार मानतो.
तुषार गायकवाड,
सामाजिक कार्यकर्ते, द्रोणागिरी







