कानसळ सलग दुसर्‍यांदा ठरले स्वप्नातील गाव

। पाली /बेणसे । वार्ताहर ।

रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशन संस्थेच्या वतीने दक्षिण रायगड मधील सात तालुक्यांमध्ये गाव विकासाची कामे लोक सहभागामधून मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. याच कामाला गती देण्यासाठी आणि लोकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे आणि संचालक प्रदीप साठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नातील गाव या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये कानसळ हे गाव सलग दुसर्‍या वर्षी स्वप्नातील गाव म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले.

कानसळ गाव विकास समिती, युवा मंडळ, महिला आणि ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन गाव विकास व आदर्श गाव करण्याच्या हेतूने 2019 पासून प्रयत्न सुरू केले. स्वदेस फाउंडेशन च्या सहकार्याने गावकर्‍यांनी स्वच्छ, सुंदर, स्वास्थ, साक्षर आणि समृद्ध या मुख्य घटकांचा विचार करून गाव विकास आराखडा बनवला आणि त्यानुसार कामाला सुरुवात केली. गाव सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी गावातील महिला व युवक यांनी हिरीरीने मोठा सहभाग घेतला व दुसर्‍यांदा आपले गाव स्वप्नातील गाव बनविले.

गावाची पूर्वीची परिस्थिती खूप दयनीय होती, परंतु स्वदेस फाऊंडेशन मार्फत झालेली पाणी योजना, शौचालय, शाळेसाठी शौचालय, शाळेसाठी सौर लाईट, ग्रंथालय, सौर पथदिवे, मुलांसाठी संगणक, प्राथमिक उपचार पेटी, तसेच वेगवेगळ्या उत्पन्न वाढीच्या योजना राबविण्यात आल्या. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी शेतात फळबाग लागवड, ठिबक सिंचनच्या माध्यमातून चारा लागवड केली आहे व कुक्कुटपालनासारखे व्यवसाय सुरू केले आहेत. गावामध्ये 100 टक्के लोकांचे बँक खाते आहे, घर पक्के व रंगीत आहे, आरोग्य विमा, घरगुती गॅस, घरे घरगुती सौर ऊर्जा वापरतात, लोकांचे आधार कार्ड, लोकांचे जातीचे दाखले आणि प्रत्येक कुटुंबाची आर्थिक उत्पन्न वाढ होण्याच्या दिशेने वाटचाल, मोतीबिंदू मुक्त गाव आहे, 0 ते 16 वयोगटातील 100% मुले शाळेत जातात. स्वप्नातील गाव घडविण्यासाठी गाव विकास समितीचे सर्व सदस्य, बचत गटांमधील महिला, युवक व ग्रामस्थ आणि स्वदेस फाऊंडेशन टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे गाव स्वप्नातील गाव प्रमाणित केले.

या कार्यक्रमासाठी स्वदेस फाऊंडेशनचे संचालक प्रदीप साठे, वरिष्ठ व्यवस्थापक शिवदास वायाळ, वरिष्ठ समन्वयक सोनाली पवार, किरण शिंदे उपस्थित होते. तसेच गाव विकास समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा या स्वच्छ, सुंदर, स्वास्थ, साक्षर आणि समृद्ध स्वप्नातील कानसळ गावाला आपण एकदा भेट द्यावीच, असे आवाहन सुधागड तालुक्यातील कानसळ गावातील ग्रामस्थ आणि स्वदेस फाऊंडेशन यांनी केले आहे.

Exit mobile version