‘भावशेत ठाकूरवाडी’ बनले स्वप्नातील गाव
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
‘स्वप्न पहावे उघड्या डोळ्यांनी’ या स्वदेस फाऊंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांच्या विचारातून व झरिना स्क्रुवाला यांच्या साथीने गावाला विकासाची प्रेरणा मिळाली. त्याच विचाराच्या प्रेरणेतून भावशेत ठाकूरवाडी हे रायगड जिल्ह्यातील पहिले आदिवासींच्या स्वप्नातील गाव बनले आहे.
स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वप्नातील गाव म्हणून सुधागड तालुक्यातील पहिले आदिवासी गाव म्हणून भावशेत ठाकूरवाडी हे गाव स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले. स्वप्नातील गाव बनवण्याच्या संकल्पनेतून वाटचाल करीत असताना, गावामध्ये अनेक शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व आरोग्य विकासात्मक योजना राबवून ग्रामस्थांनी गावाचा सर्वांगीण विकास केला.
स्वदेस फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली गावात तीन वर्षांपूर्वी गाव विकास समिती स्थापन करण्यात आली होती. गाव विकास समितीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून गावात हरित क्रांती, वृक्षलागवड, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, पथदिवे, हागणदारीमुक्त गाव, शासकीय पेन्शन, शासकीय मूळ कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, महिला बचत गट, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, घरकुल योजना, करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल शाळा, समृद्ध अंगणवाडी, सौर पथदिवे, 100 टक्के कुटुंबांना सौरऊर्जा संच अशा अनेक उपक्रमातून गाव आदर्श बनविले.