| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई परिसरातील येणाऱ्या सर्व शाळांच्या मधील कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी सक्तीची करून घेण्याची मागणी मानवता फाऊंडेशनने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात संघटनेचे अध्यक्ष संजय पवार यांनी म्हटले आहे की, नवी मुंबई हे झपाट्याने वाढत जाणारे 21 व्या शतकातील एक आधुनिक शहर आहे या शहरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था लाखो विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व उच्च शिक्षण देत आहेत. नुकत्याच घडलेल्या बदलापूर येतील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने केलेले लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे आहे त्या नंतरच्या जनप्रक्षोभालादेखील मोठ्या प्रमाणावर पोलीस प्रशासनाला सामोरे जावे लागले होते.
नवी मुंबई परिसरातदेखील मोठ्या प्रमाणावर नामांकित शालेय संस्था व महाविद्यालय आहेत त्यामधील अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून शाळेत किंवा विद्यालयात आणि उच्च शालेय महाविद्यालयात कार्यरत सर्वच कर्मचाऱ्यांची पोलीस चरित्र पडताळणी सक्तीची करण्यात यावे, त्याने अशा तऱ्हेच्या अघटित घटनांना आळा घालण्यासाठी हातभार लागेल आणि भविष्यात नवी मुंबई परिसरात अशा घटना घडणार नाहीत. या संदर्भातील निवेदन व मागणीचे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सुद्धा पाठविण्यात आले आहे.