अंदाजांचा पाऊस 

यंदाच्या मान्सून हंगामात एकशेतीन टक्के पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी व्यक्त केला. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असेही त्यात म्हटले आहे. पाऊस भरपूर पडणार ही दुष्काळी भागांसाठी चांगली बातमी असली तरी सरासरीपेक्षा जास्त पाऊस याचा अर्थ पूर येण्याच्या आणि नको तिथे नको तितका पाऊस पडण्याच्या शक्यता वाढणार आहेत. शिवाय थोडक्या काळात ढगफुटीसारखा पाऊस पडण्याचा व त्यातून नुकसान होण्याचा संभवही गृहित धरायला हवा. पावसाचे अंदाज बांधण्याच्या बाबत गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या हवामान खात्याने बरीच प्रगती केली आहे. आता याबाबतचे पहिले, दुसरे व अंतिम अंदाज येतात त्याकडे शेतकरी लक्ष ठेवून असतात. या संदर्भातील नकाशा-साक्षर अभ्यासकांची संख्याही आता खूप वाढली आहे. त्यामुळे हे अंदाज म्हणजे केवळ हवेतील भाकिते असे म्हणून त्यांची पूर्वी जी चेष्टा होत असे तशी आता होत नाही. पण गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात स्कायमेटसारख्या खासगी संस्थांचा प्रवेश झाल्यापासून हवामान अंदाजांमध्ये स्पर्धा सुरू झाली असून तिला आता अनिष्ट वळण लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. यंदा सरकारी हवामान खात्याने केरळात मान्सून वेळेआधी दाखल झाल्याची घोषणा केली. पण स्कायमेटने त्याला आक्षेप घेतला असून याबाबतचे आवश्यक ते शास्त्रीय निकष पूर्ण झालेले नाहीत असा दावा केला आहे. केरळमधील तिरुवंतपुरम, कोट्टायम, कोची अशा विविध ठिकाणच्या चौदापैकी नऊ केंद्रांमध्ये अडीच मिलीलीटर पाऊस होणे आणि वार्‍याचा वेग विशिष्ट असणे असे हे काही निकष आहेत. भारतीय हवामान खाते मात्र आपल्या निष्कर्षांवर ठाम आहे. गंमत अशी की 2020 आणि 2021 मध्ये बरोबर याउलट घडले होते. तेव्हा स्कायमेटने मेअखेरीस केरळात पाऊस आल्याचे जाहीर केले आणि भारतीय हवामान खात्याने याच निकषांचे कारण देत त्याला आक्षेप घेतला. केरळात होत असलेला पाऊस हा मान्सूनपूर्व सरी आहेत असे तेव्हा हवामान खात्याचे म्हणणे होते. पण नंतर प्रत्यक्षात असे झाले की, मान्सूनपूर्व आणि मान्सून असा भेद उरलाच नाही. पाऊस सुरू झाला तो झालाच. यात खरोखरच शास्त्रीय माहितीचे विश्‍लेषण करण्यामधील प्रामाणिक मतभेद असतील तर समजण्यासारखे आहे. पण हे केवळ एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी होत असेल तर ते चिंताजनक आहे. त्यामुळे हवामान क्षेत्रातील वरिष्ठ जाणकारांनी यावर प्रकाश टाकून योग्यायोग्यतेचा फैसला करायला हवा. अंतिमतः हा देशातील शेती क्षेत्राशी संबंधित अत्यंत संवेदनशील मामला आहे. हवामान खात्याच्या भाकितांवर विसंबून शेतकरी अनेकदा पेरणीचा निर्णय घेतात. हे निर्णय चुकले व नंतर पाऊसच न झाल्याने पुन्हा पेरण्या कराव्या लागल्या तर त्यांचा खर्च व त्रास काय असतो हे शेतकरीच जाणू शकतील. त्यामुळे हवामानाचे अंदाज म्हणजे शेअर बाजारातील एखादा शेअर नव्हे की, एसी खोलीत बसून काही ब्रोकर्सनी त्याचे भाव वर-खाली करावेत. हा या देशातील कोट्यवधी लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न आहे. लोकांची शेती, पिके, व्यापार त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हे अंदाजांचे आणि टीकेचे पाऊस पाडणे त्वरीत थांबवून खासगी व सरकारी संस्थांनी एकमेकांना पूरक व उपकारक ठरेल अशा रीतीने काम केले पाहिजे. गेल्या काही वर्षात एखाद्या विशिष्ट ठिकाणी ढग फुटल्याप्रमाणे एक-दोन तासात विक्रमी पाऊस पडण्याच्या घटना वाढत आहेत. देशाच्या जास्तीत जास्त भागात हवामानाचा अभ्यास करणारी केंद्रे स्थापन झाली तर अत्यंत स्थानिक पातळीवरचा अधिक अचूक अंदाज देता येऊ शकतो. म्हणजे रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल असे ढोबळ भाकित न देता अलिबाग, पोयनाड, रेवदंडा या प्रत्येक ठिकाणी कोणत्या वेळी व किती पाऊस पडेल याचा बराचसा अचूक अंदाज देणे नवीन तंत्रज्ञानानुसार शक्य होत आहे. यासाठीचा खर्च कोण्या एकानेच करण्याऐवजी खासगी व सरकारी संस्थांनी वाटून घेतला तर अंदाजात मजबुती येईल. हा देवाणघेवाणीचा व्यवहार कसा ठरवायचा याचं मार्गदर्शन करायला आपल्याकडे हवे तितके सल्लागार मिळतील. त्यामुळे आता चुकीची स्पर्धा थांबवून सहयोग करायला हवा. 

Exit mobile version