विदेशी प्रतिनिधींचे भारतीय पारंपरिक पद्धतीने औक्षण

मतदान साहित्य वाटप-वाहतूक प्रक्रिया पाहणी आणि स्ट्राँग रूमला भेट

| रायगड | खास प्रतिनिधी |

विदेशी प्रतिनिधींचे मंडळ निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्याकरिता सोमवारी सकाळी दाखल झाले. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी आणि पथकाच्या साहित्य वाटप, वाहतूक आणि स्ट्राँग रूम तसेच मतमोजणी कक्षाची त्यांनी पाहणी केली.

भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानुसार रायगडमध्ये सात देशांतील प्रतिनिधी आले आहेत. या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबाग-मांडवा जेट्टी येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी स्वागत केले. यावेळी भारतीय संस्कृतीनुसार पारंपरिक पद्धतीने औक्षण, फेटा आणि हार घालून स्वागत करण्यात आले. विदेशी प्रतिनिधी मंडळामध्ये बांगलादेशचे दोन प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी, जी.एम. शाहताब उद्दीन (बांगलादेश निवडणूक आयोग अधिकारी), कझाकिस्तानचे दोन प्रतिनिधी नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन (केंद्रीय निवडणूक आयोग कझाकिस्तान), श्रीलंकेच्या सिलया हिलक्का पासिलीना (संचालक श्रीलंका), झिम्बाबेचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बाबे) यांचा समावेश आहे.

या प्रतिनिधींनी जेएसएम महाविद्यालयात सुरु असलेल्या मतदान केंद्रस्तरीय पथकाच्या साहित्य वाटपाची पाहणी केली. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर जाण्यासाठी केलेल्या वाहतूक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचबरोबर मतदान यंत्राविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांना एकूण मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट याविषयी प्रत्यक्ष हाताळणी करून दाखविले. नेहुली येथील स्ट्राँगरूमचीदेखील पाहणी केली. मतदानानंतर स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात येणार्‍या मतदान यंत्राची विधानसभा मतदारसंघनिहाय रचना केली जाते, त्याची पाहणी केली. तसेच त्यांनी त्याविषयी सविस्तर माहिती घेतली. मतमोजणी कशा पद्धतीने होते, मतमोजणी केंद्राची रचना, आवश्यक त्या सर्व बाबींची माहिती घेतली.

Exit mobile version