विदेशी पाहुणे स्थिरावले; पक्षी निरीक्षक सुखावले

जिल्ह्यातील वातावरण पक्षांसाठी झाले अनुकूल

| सुधागड-पाली | वार्ताहर |

थंडीच्या हंगामात हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी, विदेशी पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होतात. अवकाळी पावसामुळे या पक्षांची वाताहत झाली होती. मात्र, मागील आठवड्यापासून वातावरण अनुकूल झाल्याने हे पाहुणे स्थिरावले आहेत, तर दुसरीकडे पक्षी अभ्यासक, निरीक्षक आणि पर्यटक सुखावले आहेत.

गणेशोत्सवानंतर आलेला पाऊस, ऑक्टोबर हिट तसेच अवकाळी पाऊस अशा हवामानातील बदलामुळे स्थलांतरित पक्षांसाठी पोषक परिस्थिती नव्हती, मात्र आता पुन्हा थंडीच्या आगमनास सुरुवात झाल्याने पक्षी जिल्ह्यात दाखल होत आहेत. गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने निसर्गरम्य रायगड जिल्ह्यात परदेशी स्थलांतरित पक्षी आणि काही स्थानिक स्थलांतरित पक्षांची रेलचेल पाहायला मिळत आहे. वाढलेल्या गवंतामधील कीटक व आळ्या, साठलेल्या जलाशयामधील कीटक, कृमी, मृदुकाय जीव-जंतू तसेच समुद्र किनारे, दलदलीचे भाग यामधील छोटे खेकडे, मृदुकाय प्राणी, मासे, जल कीटक हे खाऊन पर्यावरणाचे संरक्षण व जैवविविधता समृद्ध करण्यात पक्षांची भूमिका महत्वाची असते. या पक्षांचे दर्शन जिल्ह्यातील समुद्रकिनारे, दलदलीच्या जागा, जंगले, भातशेती, खाड्या तसेच गवताळ प्रदेशात होत आहे. परिणामी पक्षी अभ्यासक व निरीक्षकांना तसेच पर्यटकांना ही मोठी पर्वणीच आहे.

उत्तर गोलार्धातील युरोप, रशिया आणि उत्तर अमेरिका यासारख्या देशात थंडीच्या दिवसात पडणाऱ्या बर्फामुळे जमिनीवरील भूभाग हा बर्फाने आच्छादलेला असतो. त्यामुळे पक्षांना खाद्य मिळणे कठीण होऊन जाते. म्हणून हे पक्षी विविध देशात स्थलांतर करून आपली उपजीविका भागवतात. आपल्याकडे पडणारी थंडी आणि पुरेशा प्रमाणात मिळणारे खाद्य तसेच योग्य अधिवास या सर्व कारणांमुळे या पक्षांना घरटी बांधून पिल्लांचे संगोपन करणे सोपे जाते. म्हणून बऱ्याच स्थलांतरित पक्षांचा विणीचा काळ सुद्धा हाच असतो, असे माणगाव तालुक्यातील विळे-भागाड येथील पक्षी अभ्यासक राम मुंडे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यात 400 हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद आहे. स्थलांतरित पक्षांसाठी येथे अनेक प्रकारचे पोषक नैसर्गिक अधिवास आहेत. त्यामुळे चांगल्या संख्येने पक्षी दाखल होतात. समुद्रकिनारे, पाणथळीचे प्रदेश, घनदाट जंगले, माळराने अशा अधिवासांमध्ये विविध प्रकारच्या पक्षी प्रजाती जिल्ह्यात थंडीच्या मोसमात येतात. पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी ही गुलाबी थंडी पर्वणीच असते.

शंतनु कुवेसकर
वन्यजीव अभ्यासक, माणगाव
परदेशी स्थलांतरित पक्षांचा बोलबाला
ब्ल्यू थ्रोट (शंकर), युरोपियन रोलर (तास पक्षी), युरेशियन रायनेक (मानमोडी), सायबेरियन स्टोनचाट (गप्पीदास पक्षी), बंटिंग्स (भारीट पक्षी), पॅलिड हॅरिअर (पांढूरका भोवत्या) अशा परदेशी स्थलांतरीत पक्षांचे दर्शन होत आहे.
स्थानिक पक्षांचे आगमन
पॅराडाईज फ्लाय कॅचेर (स्वर्गीय नर्तक), इंडियन रोलर (भारतीय तास पक्षी), श्राईक (खाटीक), युरेशियन हुपू (हुदहुद), क्रेस्टेड बंटीग (युवराज).
Exit mobile version