वनविभागाचा रेल्वे मार्गाला हिरवा कंदील

कर्जत-पनवेलच्या वनजमिनीतील बांधकामाला सुरुवात

| नेरळ | प्रतिनिधी |

मध्य रेल्वेवरील कर्जत-पनवेल मार्ग जोडणारा रेल्वे मार्ग 15 वर्षांपूर्वी बनविण्यात आला होता. त्या एकेरी मार्गामुळे वाहतूक व्यवस्थित होत नव्हती आणि दुसरीकडे त्या एकेरी मार्गावर असलेल्या बोगद्यात दगड खाली पडत असल्याने या मार्गावर अद्याप उपनगरीय लोकल वाहतूक सुरु झालेली नाही. त्यामुळे मध्य रेल्वेकडून या मार्गावर अन्य मार्ग बनविला जात असून, त्या नियोजित मार्गावर असलेल्या वन जमिनीमध्ये रेल्वेला बांधकाम करू दिले जात नव्हते. दरम्यान, त्यानंतर रेल्वेकडून सदर जमिनीत बांधकाम करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता त्या भागात वेगाने कमला सुरुवात झालेली आहे.

हार्बर मार्गावरील पनवेलपासून मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत येथे जाण्यासाठी रेल्वे मार्ग अस्तित्वात आहे. मात्र, त्या एकेरी मार्गाचा उपनगरीय लोकल सेवेसाठी वापर होत नसल्याने हा मार्ग केवळ मालवाहू गाड्यांसाठी वापरात आहे. मात्र, मुंबईमधील वाढती लोकसंख्या कर्जत भागात विस्थापित होत असल्याने रेल्वेकडून त्या ठिकाणी दुहेरी मार्गिका बांधण्याचे काम 2020च्या अर्थसंकल्पात मंजूर झाले होते. मात्र, त्या 29 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, कर्जत ते पनवेल यादरम्यान तीन ठिकाणी वनजमीन आहे. त्या जमिनीवरून रेल्वे मार्गिका टाकण्याचे काम करण्यास वन विभागाने हरकत घेतली होती. त्यावेळी रेल्वेकडून वन जमिनीची परवानगी घेण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि त्यासाठी केलेल्या अटींच्या पूर्तता झाल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून कर्जत तालुक्यातील वन जमिनीवर कर्जत पनवेल मार्गाचे बांधकाम सुरु झाले आहे. कर्जत येथील कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरून पूल बांधला जात असून, रेल्वे मार्गिका टाकण्यात येणार आहे. त्यासाठी पुलाचे बांधकाम सुरु असून, कर्जत तालुक्यातील बांधकामाला वेग आला आहे.

Exit mobile version