। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड वनपरिक्षेत्रातील काही नागरिकांनी जीवाची बाजी लावून वणवे विझवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. या नागरिकांनी वणवे विझवण्यासाठी वनविभागाला सहकार्य करून वन संरक्षण व संवर्धनाचे काम केल्याबद्दल त्यांना सुधागड-पाली वनविभागातर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तालुक्यात मागील काही दिवसांत विविध ठिकाणी वणवे लागले होते. त्यावेळी येथील स्थानिक नागरिक वणवे विझवण्यासाठी पुढे आले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे वनांचे मोठे नुकसान टळले आहे. शिवाय पशुपक्षी व जैवविविधतेचे नुकसान होण्यापासून वाचवले आहे. या कार्याची दखल वनपरिक्षेत्र अधिकारी सुधागड विशाल सोनवणे यांनी घेतली आणि या सर्व नागरिकांना उप वनरक्षक अलिबाग वनविभाग अलिबाग यांच्या मान्यतेने सन्मानपत्र देण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुधागड विशाल सोनवणे, वनपाल मजरे जांभूळपाडा मनोज साळवी, लिपिक संतोष भिंगारदिवे आदींसह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच युगा विशाल सोनवणे उपस्थित होते.