वनवणव्यांनी शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान

| पोलादपूर । वार्ताहर ।

तालुक्यातील वनवणव्यांनी गेल्या आठवडाभरात जोर धरला असून या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या सप्ताहामध्ये वनवणवा प्रतिबंधक सप्ताहाचे आयोजन करण्यास वनविभाग पोलादपूर परिमंडळ विसरून गेल्याने शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्यासंदर्भात कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे दिसून आले. आणि सवाद भागासह तालुक्यात सर्वत्रच छोटया मोठया स्वरूपात वणव्यांनी घेरल्याने आंबा-काजू तसेच अन्य झाडांचे नुकसान झाले आहे. गुरांच्या गोठयांपर्यंत वणव्यांच्या ज्वाळांनी लपेटल्यानंतरही वनविभागाने या वणव्यांकडे गांभिर्याने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.

तालुक्यातील चोळई येथे गेल्या गुरूवारी सायंकाळी कोंढवी फणसकोंड येथील मूळचे रहिवासी असलेले शेतकरी संतोष कृष्णा म्हस्के यांच्या गुरांच्या वणव्याच्या ज्वाळांचा शिरकाव होऊन दोन रेडे होरपळल्याने त्यांचे तब्बल दोन लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी योगेश वार्डे यांनी केला आहे. सवाद भागातील रविवारी लागलेल्या वनवणव्यांनी देखील 31 शेतकर्‍यांचे आंबा व काजूंच्या झाडांचे नुकसान झाले. तलाठी वंदना गिमेकर आणि कृषी विभागाचे कृषी सहायक बरकडे यांनी सोमवारी धाव घेऊन नुकसानीचा पंचनामा प्रस्ताव शासनाकडे सादर केले. मात्र यावेळीदेखील पोलादपूर वन परिमंडळाचे कर्मचारी फिरकले नाहीत.

तालुक्यातील सडवली, काटेतळी, वाकण खांबेश्‍वरवाडी, परसुले, क्षेत्रपाळ व दिसेधोंड-रानबाजिरे या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त बिबटे, रानडुक्कर आणि रानगवे यांच्या वावराबद्दल तसेच या वन्यजीवांपासून संरक्षणासंदर्भात माहिती देण्यात आली. कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्यामुळे पोलादपूर तालुक्यातील ग्रामस्थांना वणवे आणि याबाबत जनजागृती करण्याचा कार्यक्रम कर्मचारी संख्या घटल्यामुळे शक्य झाला नाही, असे प्रतिपादन परिमंडळ पोलादपूरचे वनपाल शाम गुजर यांनी केले.

कर्मचारी संख्या घटल्याने वनवणवा प्रतिबंधक सप्ताहाचे आयोजन करणे शक्य झाले नाही.

शाम गुजर ,पोलादपूर परिमंडळचे वनपाल
Exit mobile version