| कोलाड | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ताराम खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियाना अंतर्गत कोणताही निधी उपलब्ध नसताना लोक सहभागातून श्रमदानाद्वारे बुधवारी (दि.17) वनराई बंधारा बांधण्यात आला. बंधारा बांधण्यासाठी दगड, माती, रिकाम्या सिमेंटच्या पिशव्या यांचा वापर करून अतिशय कमी खर्च करून हा बंधारा बांधण्यात आला. यावेळी भाले ग्रामपंचायत दत्ताराम खांबे, चंद्रकांत शिर्के, बळीराम मंचेकर, शंकर मेढेकर, जयराम म्हसकर, विठ्ठल कदम, जयेंद्र शिंदे, तसेच मंचेकर आळी व माळी आळी येथील असंख्य ग्रामस्थ व महिला वर्ग यांच्या श्रमदानातून हा बंधारा बांधण्यात आला. वनराई बंधाऱ्या परिसरात भुजल पातळी वाढण्यास मदत होईल. शिवाय उद्धव विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. यामुळे भाले नळ पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी मदत होईल. तसेच आजूबाजूच्या जमिनीत ओलावा टिकून राहील. यामुळे वाल, मटकी, मुग व इतर कडधान्य यांच्या उत्पादनात वाढ होईल. तसेच या बंधाऱ्यामुळे परिसरातील गुरे, मोकाट जनावरे, तसेच पक्षी यांना पाण्याचा आधार मिळणार आहे.







