| पाताळगंगा | वार्ताहर |
उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याचे स्त्रोत तळ गाठतात. त्यामुळे वनराई बंधारे शेतकर्यांसह पशु-पक्ष्यांसाठी वरदान ठरत आहेत. वाहत्या पाण्याच्या ठिकाणी सिमेंटच्या गोणींमध्ये माती भरुन बंधार्यांची निर्मिती केली तर पाण्याच्या पातळीत वाढ होऊन यातून पुढील अनेक दिवस गुराढोरांची तहान भागविली जाईल. त्याचप्रमाणे शेतकर्यांना शेती करणेदेखील सोयीचे होऊन त्यातून चांगली पिके घेता येतील.
दरम्यान, गाव पातळीवर बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबविणे काळाची गरज आहे. यामुळे वनराई बंधारे शेतकरी आणि पशु-पक्षांसाठी वरदान ठरत आहेत. पावसाळा संपताच पाण्याचे विविध स्त्रोत्र तळ गाठत असतात. मात्र, काही ठिकाणी हेच पाणी आपल्यासाठी मोठे वरदान ठरत आहे. तुरळक ठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविले जाते. मात्र, प्रत्येकाने आपले नैतिक कर्तव्य म्हणून पाणी अडविले पाहिजे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. पशू, पक्षी, झाडे, मानव यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो.
यामुळे महत्त्व जाणून घेऊन बंधारा बांधून पाणी अडविले पाहिजे. यासाठी ग्रामपंचायतीने लक्ष घालून ही संकल्पना राबविणे महत्त्वाचे आहे. तालुक्यातील असलेले बहुतेक ओढे आता तळ गाठण्याच्या तयारीत असून, सिमेंटच्या गोणींमध्ये माती भरून प्रवाह असलेल्या ठिकाणी एकावर एक रचून ठेवल्यास काही महिने पाणी या ठिकाणी जमा होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होत असते.