हज यात्रा घडवून आणण्याचा बनाव

पावणेसहा लाखांची फसवणूक; मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड शहरातील दत्तवाडी येथील फिर्यादी अदनान नाझीमुद्दीन जमादार (35) व्यवसाय मेडिकल यांना तन्वीर याकुब चोगले, रा. वी/105, नोबल हाऊर, नशेमन कॉलनीजवळ, डोंगरे, ठाणे यांनी हज उमरा यात्रा घडवून आणण्याचे सांगून 5 लाख 70 हजार रूपयाची फसवणूक केल्याची तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सविस्तर असे आहे की, अदनान नाझीम जमादार यांच्या घरातील व त्यांच्या कुटुंबातील काकी सईदा शौकत जमादार असे सहा जणांना हाज उमर यात्रा करायाची होती. त्याकरिता लागणाऱ्या विमान तिकीट, व्हिसा याकरिता ठाणे येथील तन्वीर याकुव चोगले यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले की, आम्हाला हाज उमर यात्रा करायाची आहे, तरी विमान तिकीट, व्हिसा मिळून द्या, असे सांगितले. त्यानंतर तन्वीर याकुब चोगले हा मुरुड-दत्तवाडी येथे येऊन फिर्यादी-अदनान चोगले यांची भेट घेऊन त्यांना हाज उमरा फॅमिली टूरबाबत माहिती दिली, तसेच हाज उमरा यात्रा घडवून आणण्याची जबाबदारी घेतली. त्यासाठी प्रत्येकी 85,000/- रुपये खर्च येईल, असे सांगून सदरची रक्कम बँकेत जमा करण्यास सांगितली.

तात्काळ फिर्यादी अदनान जमादार यांनी तन्वीर याकुब चोगले याने सांगितलेल्या हरीम हाजी उमराह सर्व्हिसेसच्या नावे बँक ऑफ बडोदा या बँकेतील खाते क्र. 36050200001016 यावर 4,00,000/- रुपये आर.टी.जी.एस द्वारे जमा केले. तसेच दुसरा महिन्यात त्याच बँक खात्यावर रक्कम रुपये 1,70,000/- रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर तन्वीर चौगले यांनी लवकरात लवकर विमानाची तिकिटे व्हिसा देतो असे सांगितले होते. आज नऊ महिने व्हायला आले तरी तिकीट मिळाले नाही, तसेच त्यांच्याकडून कोणाताही प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक तन्वीर चोगले यांनी केली आहे, याची खात्री पटल्यावर त्याची रितसर तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात अदनान जमादार यांनी केली. तन्वीर याकुव चोगले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास मुरुड पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढाकरे करीत आहेत.

Exit mobile version