पर्यावरणवादी संस्थांकडून नाराजी; पक्ष, उमेदवारांचे दुर्लक्ष
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात पर्यावरणाची समस्या गंभीर असून लुप्त होत चालेली खारफुटी, अनियमित पाऊस, पूरपरिस्थिती, वायू आणि सागरी प्रदूषण यांसारख्या समस्या राज्याला भेडसावत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जागतिक पातळीवर दरडोई मोकळी जागा नऊ चौरस मीटर असताना नवी मुंबईत दरडोई मोकळी जागा 3.9 चौरस मीटर; तर मुंबईत केवळ 1.1 चौरस मीटर दरडोई मोकळी जागा शिल्लक राहिली आहे.त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात उभी राहणारी कॉँक्रिट जंगले पर्यावरण र्हासाचे एक गंभीर कारण असल्याचे नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी नमूद केले आहे. याकरिता लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसे न केल्यास विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी उमेदवारांना याबाबत जाब विचारण्याची गरज असल्याचे मत कुमार यांनी व्यक्त केले आहे.
विधानसभा निवडणुक प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय नेते आणि उमेदवारांकडून पर्यावरण विषयाकडे पूर्णपणे डोळेझाक करण्यात आल्याची खंत पर्यावरणवादी संस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे. जबाबदारी लोकप्रतिनिधींचीवाढत चाललेले अनियंत्रित बांधकाम, वाहनांची होणारी वाढ यामुळे शहरातील हवा प्रदूषित झाल्याने याचा परिणाम नागरिक आणि विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांवर होत आहे. हे प्रदूषण नियंत्रणात रहावे यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे जसे गरजेचे आहे. तसेच, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मुख्य जबाबदारी लोकप्रतिनिधींचीदेखील असल्याचे मत वॉचडॉग फाऊंडेशनचे संचालक अॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी व्यक्त केले. सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन द्यावे आणि वाहनांचे उत्सर्जन रोखण्यासाठी पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन द्यावे, असे पिमेंटा यांनी सुचवले आहे.
निर्देशांकात भारत शेवटीजैवविविधता निर्देशांकात भारताचा 180 देशांमध्ये 176 वा क्रमांक लागत असल्याने संपूर्ण भारतासाठी पर्यावरणाचा मुद्दा अतिशय गंभीर बनला आहे. त्यामुळे पर्यावरण बचावासाठी वृक्षारोपण आणि संरक्षण मोहिमेवर सरकारने लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन पर्यावरणवादी संघटनांकडून करण्यात येत आहे.
सागर शक्तिसारखी संघटना उरण परिसरात समुद्राच्या आंतरभरती आणि ओहोटीसंदर्भात काम करत आहे. प्रशासकीय अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे उरणजवळील समुद्राचे पाणी दूषित झाल्याचा आरोप संघटनेचे संचालक नंदकुमार पवार यांनी केला आहे. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वळवल्यामुळे उरण परिसरातील गावांना अवकाळी पुराचा फटका बसत असल्याचे पवारांनी सांगितले आहे. तसेच मुलुंडसारख्या भागात मिठागरांच्या जागेवर गृहनिर्माण केल्याने त्या भागात पुराचा धोका वाढल्याचे उदाहरण पवारांनी दिले आहे. तरीही यातून आपण काहीच धडा घेतला नसल्याची खंत पवारांनी व्यक्त केली आहे.