मतभेद विसरा, संविधान वाचवा

आ. जयंत पाटील यांची कार्यकर्त्यांना साद


| रायगड | खास प्रतिनिधी |

देश लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे. देश आणि देशाचे संविधान वाचवण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आता कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद, मनभेद विसरुन एकत्र आले पाहिजे, तर भाजपाला लोकसभा निवडणुकीत गाडता येईल, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले. आमदार जयंत पाटील यांच्याच पुढाकारातून अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृह येथे इंडिया आघाडीतील घटक पक्षांतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्याप्रसंगी आमदार पाटील बोलत होते.

रायगड लोकसभेसाठी इंडिया आघाडीने माजी खासदार अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे. गीते हा एक सच्चा आणि भ्रष्टाचाराचा डाग नसलेला सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळे गीतेंना पुन्हा लोकसभेत निवडून आणण्याची गरज आहे. इंडिया आघाडीने उमेदवार दिला आहे, मात्र महायुतीने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. गीतेंविरोधात सुनील तटकरेच उमेदवार असायला पाहिजे. त्यांना माझे आव्हान आहे की, त्यांनी निवडणुकीतून पळ काढता कामा नये. तटकरेंसारख्या नतद्रष्टाला कायमचे गाडायचे काम आपल्याला मिळून करायचे आहे, असे आ. पाटील म्हणाले.

गद्दार खोक्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना कंटेनरमध्ये बसवून समुद्रात बुडवण्याची वेळ आली आहे, असा निशाणा आ. पाटील यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटाला लगावला. तटकरेंना पाडण्यासाठी आम्ही अनिल तटकरेंना घेऊन आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. मावळ लोकसभेतदेखील संजोग वाघेरे-पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. एकत्र काम केल्यास विजय हा इंडिया आघाडीचाच आहे, असेही ते म्हणाले. भविष्यात इंडिया आघाडी कायम ठेवल्यास विरोधकांना पळता भुई थोडी होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपाने राहुल गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राहुल यांच्यामध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात भिडण्याची आग आहे. सत्ताधारी मोदींना कोण पर्याय आहे, असे विचारत असतील, तर राहुल गांधी हा एकमेव पर्याय असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हेेदेखील आमूलाग्र बदल झाला आहे, असेही ते म्हणाले. स्वर्गीय अंतुले यांच्याबरोबर आमची कायम लढत झाली होती. मात्र, अंतुलेंना दूरदृष्टी होती. त्यामुळे अंतुलेंचे नाव जिल्ह्यात जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशात काँग्रेसचे फार मोठे योगदान आहे, हे कोणीही विसरता कामा नये. त्यांनी देशात विविध बदल घडवून आणले आहेत. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करुन ‌‘हम करेसो कायदा’ असे कृत्य केले. त्यांना त्यावेळी निवडुणकीत हार पत्करावी लागली. त्यांनी केलेली चूक त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा जिद्दीने सत्ता काबीज केली, असेही त्यांनी सांगितले. रायगड आणि मावळच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचे आहे. इंडिया आघाडीत नेत्यांची आघाडी झाले आहे, आता घटक पक्षातील कार्यकर्त्यांची आघाडी झाली पाहिजे. यासाठी सर्वांनी कामाला लागा, असे आवाहन इंडिया आघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गीते यांनी केले.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला फारसे यश मिळाले नाही. तेथे घटक पक्षाला सोबत न घेतल्याने काँग्रेसला फटका बसला आहे. आता मात्र काँग्रेस तशी चूक करणार नाही. मतांचे विभाजन टाळण्यासाठी घटक पक्षांतील सर्वांनी एकत्र लढले पाहिजे, असे गीते यांनी सांगितले. मोदींच्या विरोधात देशात संतापाची त्सुनामी लाट तयार झाली आहे. त्या लाटेवर भाजपा भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही. देशातील स्वातंत्र्य, लोकशाही, संविधान, सर्वांचे हक्क अबाधित ठेवायचे असतील, तर हुकूमशाहाला गाडावेच लागेल, असा घणाघात गीते यांनी केला.

मुंबईसह कोकणातील 12 जागांपैकी 10 जागा या इंडिया आघाडीलाच मिळणार आहेत. केवळ दोनच जागा भाजपाला मिळतील, असे भाकीत गीते यांनी केले. पनवेल-अलिबाग रेल्वेसाठी जयंत पाटील यांनी पत्रव्यवहार केला आहे. त्याचा पाठपुरावा मी केल्याने ती मंजूर झाली आहे. पुढील पाच वर्षांत अलिबागला रेल्वे धावेल, असेही त्यांनी सांगितले. गद्दारी केलेल्यांना असा धडा शिकवायचा आहे की, पुन्हा कोणी गद्दारी करण्याचे धाडस करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी आमदार अनिल तटकरे, माजी आमदार बाळाराम पाटील, उल्का महाजन, सतीश लोंढे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, स्नेहल जगताप, सुरेश टोकरे, प्रवीण ठाकूर, प्रशांत पाटील, सुप्रिया पाटील, आस्वाद पाटील, प्रशांत नाईक, शिशिर धारकर, शिरीष घरत, विष्णू पाटील, चित्रलेखा पाटील, चित्रा पाटील, महादेव दिवेकर, सुरेंद्र म्हात्रे, अनिल नवगणे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version