। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती तसेच तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची सभा गुरुवार दि.5 मे रोजी माणगाव तहसीलदार यांच्या दालनात संपन्न झाली. या दोन्ही समित्यांच्या सभांचे तालुक्यातील पत्रकारांना निमंत्रण देण्यात आले नसून माणगाव तहसील कार्यालयाला पत्रकारांचा विसर पडलेला दिसत आहे.
तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या सभेत विविध खात्याच्या अधिकार्यांकडून तालुक्यातील विविध प्रश्नांची माहिती घेतली जाते. या समन्वय समितीच्या सभेला समन्वय समितीचे पदाधिकारी, विविध खात्याचे अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना बोलावले जाते. यापूर्वी जुने तहसील कार्यालय याठिकाणी समन्वय समितीच्या अनेक सभा झाल्या असून या सभांतून सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी तालुक्यातील विविध प्रलंबित अशा प्रश्नांवर आवाज उठविला आहे.
या प्रश्नांवर संबंधित खात्याच्या अधिकार्यांना उत्तरे द्यावी लागतात. एखादा प्रश्न रेंगाळला असेल तर तो कधी मार्गी लावणार याची माहिती समन्वय समिती घेऊन पुढच्या सभेला येताना अधिकारी वर्गांना तो प्रश्न मार्गी लावावा लागतो अन्यथा काही अडचणी आल्यास त्या समितीच्या समोर ठेवाव्या लागतात. या सभांना विविध खात्याचे अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी पूर्ण तयारीने हजर राहावे लागतात. तालुका समन्वय समितीची सभा सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच लागली होती. ही सभा तहसीलदार यांच्या छोटयाश्या दालनात समिती पदाधिकारी व विविध खात्याचे अधिकारी यांच्याच उपस्थितीत घेण्यात आली. खरेतर हि सभा तहसीलच्या वरील मोठ्या सभागृहात होऊन या सभेला प्रश्न उपस्थित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना निमंत्रित करणे आवश्यक होते. परंतु पत्रकारांना या सभेला तहसील कार्यालयाने डावलल्याचे दिसले. याबाबत तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष इकबाल धनसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.







