वृक्षारोपणाचा पालिकेला विसर

कर्जत-भिसेगाव रस्त्यावर झाडे लावणार कधी?

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या भिसेगाव ते कर्जत चारफाटा या रस्त्यावर अतिक्रमण तोडून आणि नव्याने रस्त्याचे बांधकाम होऊन अनेक महिने लोटले आहेत. रस्त्याच्या दुभाजकामध्ये झाडे लावण्याचा देखावा चार महिन्यांपूर्वी कर्जत नगरपरिषदेने केला आहे. मात्र, दहा झाडे वगळता रस्त्यावर कुठेही झाडे लावली गेली नाहीत. दरम्यान, रस्ते स्वच्छता अभियानात या रस्त्यावर तब्बल तीनवेळा स्वच्छता मोहीम राबविली गेली. मात्र, रस्त्यावर अद्याप झाडे लागली नसल्याने पालिका दिखाऊगिरी करीत आहे काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

कर्जत चार फाटापासून कर्जत शहरातील भिसेगाव येथे जाणारा रस्ता अनेक वर्षांनी दुपदरी तयार झाला आहे. आजही त्या रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित असून, या रस्त्याच्या दुभाजकामध्ये झाडे लावण्यात येणार आहेत. त्या रस्त्याच्या चार फाटा भागात कर्जत नगरपरिषदेकडून स्वच्छता अभियान राबविले गेले आहे. त्यावेळी कर्जत तहसील कार्यालय आणि कर्जत नगरपरिषद यांनी स्वच्छता अभियानानंतर वृक्ष लागवड कार्यक्रम राबविला होता. महसूल सप्ताह निमित्त महसूल विभागाचे अधिकारी तहसीलदार आणि नगरपरिषद यांनी त्या ठिकाणी काही झाडांचे लागवड केली. साधारण 10 ते 12 पाम जातीची झाडे लावल्यानंतर महसूल सप्ताह होऊन चार महिने लोटले तरी कर्जत चारफाटा ते भिसेगाव रस्त्यावर झाडांनाही लागवड झाली नाही. या रस्त्यावर तीनवेळा कर्जत नगरपरिषदकडून मासिक स्वच्छता अभियान राबविले गेले. त्यात अतिक्रमण काढून झाल्यावर झाडे लागवड कार्यक्रम झाला. झाडे लावण्यात आली त्यावेळी पावसाळा होता, मात्र त्यावेळी झाडे लावण्यात आली नाहीत आणि त्यानंतर आजही या रस्त्यावर चार महिन्यांपूर्वी लावलेली झाडेच आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील दुभाजकामध्ये झाडे कधी लागणार, तसेच रस्त्याच्या दुतर्फा विजेचे पथदिवे कधी लागणार हादेखील सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत.

Exit mobile version