महापालिका तलावांना डम्पिंग यार्डचे स्वरूप

। पालघर । प्रतिनिधी ।

वसई-विरार महापालिकेमार्फत शहरात करोडो रुपये खर्चून अनेक तलावांचे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. तेथे एरवी त्याचा वापर वॉकिंग ट्रॅक म्हणून केला जातो. तसेच, तलावाचे सुशोभिकरण केल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती, साफसफाई केली जात नसल्याने वसईतील बहुतांश तलावांची दुरवस्था झाल्याची तक्रार येथील स्थानीक नेते अल्मेडा यांनी केली आहे.

वसईतील गिरीज तलावाचे साडेसात कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले असतानाही या तलावाच्या आजूबाजूचा कचरा व गटाराचे दूषित पाणी या तलावात जात आहे. त्यामुळे आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे या तलावाला डम्पिंग यार्डचे स्वरूप आले आहे. एवढेच नव्हे तर महापालिकेने देवाळे तलाव, सांडोर तलाव, सालोली तलाव तसेच वसईतील अनेक तलावांचे सुशोभीकरण केलेले आहे. तेथे सुद्धा हीच तलावांची परिस्थिती आहे, अशी अल्मेडा यांची तक्रार आहे.

तसेच, ज्या ठेकेदारांना या तलावांची देखरेख करण्याची जबाबदारी दिलेली आहे, त्यांच्यावर महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी. जेथे तलावांचे सुशोभीकरण केलेले आहे, तेथे आवश्यक ती स्वच्छता करून महिला व वृद्ध नागरिकांना सुलभ वॉकिंग उपलब्ध करून द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

Exit mobile version