| मुंबई | प्रतिनिधी |
अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत शक्ती चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. शक्ती हे 2025 मधील पहिलेच चक्रीवादळ आहे. या वादळाची निर्मिती शुक्रवारी दुपारनंतर झाली. किनाऱ्यापासून पश्चिमेकडे सरकत असलेले हे चक्रीवादळ शनिवारी (दि. 4) आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र मध्य भारताकडून प्रवास करीत अरबी समुद्राकडे आल्यानंतर ईशान्य अरबी समुद्रात त्याची तीव्रता वाढू लागली आहे. ही प्रणाली शुक्रवारी (दि.3) सकाळी गुजरातमधील द्वारकेपासून 250 किलोमीटर, तर नालियापासून 280 किलोमीटर नैऋत्येकडे , पोरबंदरपासून 280 किलोमीटर पश्चिमेकडे आणि पाकिस्तानच्या कराचीपासून 380 किलोमीटर दक्षिणेकडे होती. शक्ती चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर समुद्राकडे जात असून, शनिवारी (दि. 4) मध्य अरबी समुद्रात आणखी तीव्र होणार आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात ताशी 100 ते 125 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, ही प्रणाली सोमवारपर्यंत कायम राहणार आहे.
मासेमारीला न जाण्याचा इशारा
गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत 5 ऑक्टोबरपर्यंत 45 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र
बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी दुपारी ओडिशामध्ये जमिनीवर आले असून, ही प्रणाली गोपाळपूरपासून 50 किलोमीटर नैऋत्येकडे होती. उत्तरेकडे सरकत असलेली ही प्रणाली आज छत्तीसगडकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा फारसा प्रभाव महाराष्ट्रावर नसेल. कोकणात शनिवार, 4 आणि रविवार, 5 ऑक्टोबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता नाही. यासंबंधी इतर काही सुधारीत अंदाज हवामान विभागाने वर्तवलेले नाहीत. शक्ती चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, 2025 मधील हे पहिले चक्रीवादळ आहे. शक्ती हे नाव श्रीलंकेने सुचविले आहे. तमिळ भाषेतील शख्ती (शक्ती) या शब्दाचा अर्थ सामर्थ्य असा आहे. यावरून हे नाव देण्यात आले आहे.





