राजकीय भुकंप! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला रामराम

| मुंबई | प्रतिनिधी |
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा रादीनामा दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण काँग्रेस पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. शिवाय अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही चर्चा होत होती. काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहित अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मी दिनांक 12 फेबुवारी 2024 मध्यान्हानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे, धन्यवाद, असं अशोक चव्हाण यांनी या पत्रात म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याचं जे पत्र लिहिलं आहे. यावर माजी विधानसभा सदस्य, भोकरदन विधानसभा मतदारसंघ असा उल्लेख आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट होत आहे.

काही वेळाआधी अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. तेव्हा राजीनामा देण्याची प्रक्रिया समजून घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्विकारला आहे. त्यामुळे मागच्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना आता दुजोरा मिळाला आहे.

एका मागोमाग तीन नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी
लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमध्ये मागच्या महिनाभरापासून अस्वस्थता पाहायला मिळत आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसला रामराम केला आहे.

15 तारखेला होणार पक्षप्रवेश?
अशोक चव्हाण हे आता भाजपच्या वाटेवर असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी अटकळ बांधली जात आहे. भाजपतर्फे त्यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 15 तारखेला अमित शहा महाराष्ट्रात येणार असून त्याच दिवशी अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू.

नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

विचारधारेसाठी लढण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असताना संपूर्ण आयुष्यभर ज्या विचारधारेसाठी लढलो त्याच विचारधारेचा त्याग करून भाजपशी सलगी करण्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी आहे. भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असंच सुरु राहणार असल्याने अस्मिता आणि विचारधारेसाठीचा पुढील लढा हा सर्वसामान्यांनाच लढावा लागेल आणि जनताही त्यासाठी सज्ज आहे.

आ. रोहीत पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
Exit mobile version