माजी फुटबॉलपटूचा संशयास्पद मृत्यू

पालघरच्या जंगलात आढळला मृतदेह

। मुंबई । प्रतिनिधी ।

पुणे येथे फुटबॉल सामन्यात सहभागी व्हायला गेलेल्या मुंबईतील माजी अंडर 16 फुटबॉलपटूचा पालघरच्या जंगलात मृतदेह आढळून आला. सागर सोरती (35) असे मृत फुटबॉलपटूचे नाव आहे. याप्रकरणी कासा पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सागर 15 नोव्हेंबर रोजी घरातून पुण्याला फुटबॉल सामन्यात सहभागी व्हायला जात असल्याचे सांगून गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याचा फोन बंद येत होता. कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर पोलिसांना पालघरमधील मेंढावन घाटातील जंगलात त्याचा मृतदेहच झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सागरच्या मोबाईलमुळे पोलिसांना त्याची ओळख पटवली.

सागर गेल्या दोन वर्षापासून मानसिक तणावात असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले.

Exit mobile version